मुंबईच्या लोकलमध्ये तरुणींसमोर अश्लील चाळे करणाऱ्या एका १९ वर्षीय विकृत तरुणाविरोधात रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. इम्रान शेख असं या तरुणाचे नाव आहे. पीडित महिलेने त्यावर गुन्हा न नोंदवल्यामुळे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कारवाई केली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबईच्या सीएसटी स्थानकाहून शुक्रवारी दुपारी २.४५ वा च्या पनवेलला जाणाऱ्या लोकलमधून पीडित तरुण प्रवास करत होती. डब्यात फारशी वरदळ नसताना अचानक इम्रान डब्यात चढला लोकल सुरू झाल्यानंतर त्याने तरुणीजवळ जात तिच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर शेजारच्या डब्यातील प्रवाशांचे लक्ष गेले. त्यावेळी इम्रान पळण्याच्या तयारीत होता.
एका प्रवाशाने आपल्या मोबाइलमधून इम्रानचा फोटो काढला. मस्जिद स्थानक आल्यानंतर इम्रानने धावत्या लोकलमधून उडी टाकून पळ काढला. या प्रकरणी प्रवाशांनी पीडितेला पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितली. मात्र घाबरलेली तरुणी सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळी एका प्रवाशाने लोकलच्या १५१२ या क्रमांकावर मदत मागितली. त्यानुसार वडाळा पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि प्रवाशाने दिलेल्या फोटोच्या मदतीने त्याला ताब्यात घेत ही कारवाई केली आहे.