बोरिवलीत काही दिवसांपूर्वी पूर्ववैमन्यस्यातून अंबादास उर्फ अंबु लक्ष्मण शिंदे (२९) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी तिघा मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी भारत नितीन दास उर्फ सोनू या आरोपीला अटक केली आहे.
बोरिवलीच्या शिंपोली येथील झोपडपट्टीत राहणारा अंबादास शिंदे रिक्षा ड्रायव्हर होता. अनेक सराईत गुन्ह्यात हात असल्याने पोलिसांनी त्याला यापूर्वी तडीपार केलं होतं. त्यानंतर शिंदे पुन्हा परिसरात रिक्षा चालवू लागला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकांची बोरिवलीत युनियन आहे. या युनियनतर्फे काही दिवसांपूर्वी पूजा आणि कार्यक्रम अायोजीत केला होता. त्यावेळी छापण्यात आलेल्या बॅनरवर सोनूच्या भावकीतील सदस्यांची नावे टाकण्यात आली नव्हती. त्यामागे शिंदेचा हात असल्याचा संशय सोनूला होता. त्याचबरोबर शिंदे हा दादागिरी करून रिक्षा चालकांकडून पैसे उकळायचा या गोष्टीचाही राग सोनूला होता.
सोमवारी रात्री शिंदे आणि सोनूसोबत त्याचे भाऊबंद दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी याच विषयावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सोनू आणि त्याच्या इतर साथीदारांनी शिंदे याच्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणी गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी सोनूला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.
हेही वाचा -
फसवणुकीच्या आरोपाखाली दिग्दर्शकाला अटक
परळच्या केईएम रुग्णालयातील डाॅक्टर बेपत्ता