अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या 2 महिलांना अटक केली आहे. या महिलांकडून 15 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. लता चौरे (43), राणी बरसिया (53) अशी या दोघींची नावे आहेत. या दोघींवर पोलिसांनी एनडीपीएस अॅक्टनुसार कारवाई केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.
मुंबईत एकीकडे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायझेरियन तस्करांविरोधात एएऩसीच्या पोलिसांनी कंबर कसली असताना गांजा तस्करांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र स्वत: पुढे न येता गांजा तस्करांनी आता तस्करीसाठी महिलांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
नुकतीच एएनसीच्या वरळी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना दोन महिला तस्कर वरळी दूध केंद्राजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एएनसीच्या पथकाने मद्रास वाडी, महात्मा फुलेनगर येथे आरोपी राणीच्या घरावर कारवाई केली. त्यावेळी राणीसह लता ही देखील गांजाची पाकिटं घेऊन घराबाहेर पडत होती.
पोलिसांनी या प्रकरणी दोघींना ताब्यात घेत राणीजवळून 5 किलो गांजा ज्याची किंमत बाजारात 1 लाख रुपये आहे. तर लताकडे 10 किलो गांजा मिळून आला. ज्याची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे. एकूण 15 किलो गांजासह पोलिसांनी या दोघींना एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवत अटक केली आहे.