ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं वांद्रे (पश्चिम), पाली हिल येथील घर बळकावण्याच्या प्रयत्नात असलेला बिल्डर समीर भोजवानी याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
बनावट कागदपत्रांद्वारे भोजवानी दिलीप कुमार यांचं वांद्रे येथील घर बळकावू असल्याचा आरोप दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात लक्ष घालत भोजवानी विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
दिलीप कुमार यांनी १९५३ मध्ये हसन लतीफकडून पाली हिल येथील घराची जागा १ लाख ४० हजारांना खरेदी केली होती. परिजात डेव्हलपर्ससोबत २००८ मध्ये या जागेचा पुनर्विकास करण्याचा करार झाला होता. मात्र, काही कारणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं. त्यानंतर ३० ऑगस्ट २०१७ रोजी सत्र न्यायालयाने संबंधित जागा डेव्हलपर्सला दिलीप कुमार यांना परत देण्याचे आदेश दिले. यानंतर सायरा बानो यांनी १२ सप्टेंबर २०१७ रोजी संबंधित जागेवर ताबा घेतला.
आता वांद्रे येथील पाली हिल स्थित या घराच्या जमिनीचे खोटी कागदपत्रं बनवून समीर भोजवानी नावाच्या बिल्डराने त्यांची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेकदा धमकीही दिली होती. याबाबत सायरा बानू यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे दिलीप कुमार यांची 300 कोटींची प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर भोजवानीला पोलिसांनी 26 एप्रिल 2018 रोजी अटक केली.
त्यावेळी न्यायालयाने त्याला 3 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सायरा बानो यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, भोजवाणी त्यांना वारंवार धमकी देत आहे. याशिवाय पाली हिल येथील घर जबरदस्तीने बळकवण्यासाठी बिल्डरने खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. बिल्डर भोजवाणी आपले राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाचा फायदा घेत धमकावत आहेत.
पोलिसांनी भोजवानीला अटक केल्यानंतर त्याने जामीनासाठी विशेष सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज केला होता. मात्र न्यायलयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. भोजवानीने सब रजिस्टर कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही फसवणूक केली. त्यामुळे त्याला जामिनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव टाकून पुरावे नष्ट किंवा त्यात फेरबदल करू शकतो. त्यामुळेच न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळ्याचं सांगितलं.