निर्जनस्थळी नागरिकांना बोलण्यात गुंतवून हिप्नोटाइज करून लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला भांडुप पोलिसांनी अटक केली होती. नरेश उर्फ नऱ्या विजयकुमार जयस्वाल (37) असे या आरोपीचं नाव आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
सायनच्या जीटीबी स्थानक परिसरात राहणारे तक्रारदार रमेश शेट्टी हे व्यवसायिक आहेत. नोव्हेंबर 2017 मध्ये शेट्टी हे काही कामानिमित्त भांडुप स्थानक परिसरात गेले होते. दरम्यान त्या ठिकाणी नरेश आणि त्याचे दोन साथीदार रमेश जयस्वाल (39), अशोक भाकरे (39) यांनी त्यांची वाट अडवली. रमेश यांना या तिघांनी बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्यांना स्थानक परिसरापासून काही अंतरावर असलेल्या निर्जन स्थळी नेले. त्यानंतर काय घडले याबद्दल शेट्टी यांना काहीच आठवत नाही. या तिघांनी शेट्टी यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चेन, सोन्याचा मनगटी कडा काढून घेत तेथून पळ काढला.
काही वेळांनी शेट्टी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीनं 1 नोव्हेंबर 2017 रोजी रमेश जयस्वाल आणि अशोक भाकरे याला अटक केली. मात्र या टोळीचा म्होरख्या नरेश हा पोलिसांना वेळोवेळी चकवा देत होता. अखेर रविवारी नरेश भांडुप परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. या तिघांनी अशा प्रकारे अनेकांना फसवल्याचा संशय पोलिसांना आहे.
हेही वाचा