घराबाहेर पडताना विचार करा...आतापर्यंत 95 हजार जणांवर गुन्हे दाखल


घराबाहेर पडताना विचार करा...आतापर्यंत 95 हजार जणांवर गुन्हे दाखल
SHARES
राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कलम 188 नुसार 95 हजार गुन्हे दाखल झाले आहेत तर 18 हजार 722 व्यक्तींना अटक करण्यात आली. या सर्वांकडून पोलिसांनी 3 कोटी 51 लाखाचा  दंड हस्तगत केला आहे. तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 53 हजार 071 जणांची वाहने जप्त करण्यात आली आहेत, त्यामुळे घराबाहेर पडताना सर्व सामान्यांनी जरा विचार नक्कीच करा.

 कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्णराज्य थांबलेलं आहे. राज्यात नागरिकांकडून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत असतानाच, काही हुल्लडबाजांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशांना कायद्याचा धाक दाखवण्यासाठीच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 84 हजार 945 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. क्वारनटाईन करून ही समाजात बिनदिक्कत फिरणाऱ्या 642 जणांना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर याच काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहे. तर टूरिस्ट व्हिजाच्या नावाखाली दिल्लीत जमलेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांकडून व्हिसा उलंघन केल्या प्रकरणी 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी  3 कोटी 51 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


पोलिसांसाठी दवाखाने राखीव
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील 3 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात 581 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यात मुंबई पोलिसदलातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर 39 पोलिसांनी कोरोनावर मात दिली आहे. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच मुंबईत दोन हॉस्पिटल पोलिसांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. राज्यात एकूण 4785 हजार रिलिफ कँम्प आहेत. जवळपास 4,97,256  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा