नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली अाहे. त्यामुळे तस्करांनी अाता अनोखा फंडा वापरत अौषधांमधून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात सुरुवात केली अाहे. 'इंटरनेट फार्मसी'च्या नावाखाली बेकायदेशीरपणे काही तस्करांनी खोट्या कंपन्यांची नोंद करून हा गोरखधंदा सुरू केला अाहे. यात भारताचा सहभाग लक्षणीय प्रमाणात वाढल्याचा निष्कर्ष अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) एका अहवालाद्वारे सादर केला अाहे.
अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी तरुणवर्गाला विशेष लक्ष्य करून त्यानुसार सोशल मीडियातून जाहिरातबाजी सुरू अाहे. अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी अाता अाॅनलाईन फार्मसी अाणि इंटरनेट फार्मसी यांसारखे विविध मार्ग अवलंबिले जात अाहेत.
एखादी व्यक्ती घरबसल्या जगातील कुठल्याही कोपऱ्यातून हे अंमली पदार्थ खरेदी करू शकते. मात्र हा व्यवहार सोपा नसतो. डार्क अाणि डिप अशा दोन प्रकारांत हा व्यवहार चालतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. त्यासाठी लाखो रुपयांचे बिटकाॅईन खरेदी करावे लागतात. मात्र बिटकाॅईन खरेदी करूनही तुम्हाला मेंबरशिप मिळेल, याची कोणतीही खात्री नसते. तुम्ही खरोखरच अंमली पदार्थ खरेदीसाठी सदस्यत्व घेत अाहात, याची खात्री तस्करांना होत नाही, तोपर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतले जात नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी तस्करांना अडकविण्यासाठी केलेला प्रयत्न अपयशी ठरला होता.
हे अंमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे व्हाॅट्स-अॅप ग्रूप किंवा फेसबुकवर एका सांकेतिक भाषेत कोड वापरून पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत 'फिल हाय' आणि 'ट्रान्स’मध्ये नेण्यासाठी कोकेन केटामाइन आणि टूसीबीसारखे अंमली पदार्थ विकले जातात.
शहरातल्या बहुतांश पंचतारांकित हाँटेल्समध्ये अंमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर हे अंमली पदार्थ पार्टीत आणतात. त्यामुळे शहरातील पंचतारांकित हाॅटेल्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट तसेच कुरिअर कंपन्या एएनसीच्या रडारवर आहेत.
मुंब्रा, दिवा, मीरारोड, वसई अाणि नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायझेरियन नागरिकांच्या गुन्हेगारीविषयक हालचाली रोखण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या नायझेरियन नागरिकांनी एमडी, एफेड्रिन अशा अनेक नव्या अंमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्याने या नव्या अमली पदार्थांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. बेकायदेशीररित्या भारतात आलेले ९५ टक्के नायझेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे काम करतात. २०१६-१७ मध्ये १६ तर २०१७ एप्रिलपर्यंत या तस्करीत २३ नायझेरियन नागरिकांना अटक करण्यात अाली अाहे.
पूर्वी या तस्करांना शोधण्यासाठी खबऱ्यांचे जाळे पेरले जायचे. जेव्हापासून हा व्यवहार इंटरनेटद्वारे होऊ लागला, तेव्हापासून या तस्करांना शोधणे कठीण जाऊ लागले आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या तस्करांना कसे शोधायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले अाहे. आता वेळ पडल्यास सायबर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.
- शिवदीप लांडे, पोलीस उपायुक्त (मुंबई पोलिस अंमली पदार्थ विरोधी विभाग)