मुंबईच्या वांद्रे परिसरातील बहुचर्चीत झोपडपट्टी पुर्नवसन योजनेतील (एसआरए) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने ४६२ कोटी रुपये किमतचे ३३ फ्लॅट्स जप्त केले आहेत. तपासात या फ्लॅट्सची सर्व कागदपत्रे मे. पिरॅमिड डेव्हलपर्सच्या नावावर असल्याचं पुढं आलं असून जादा एफएसआय मिळवण्याच्या नावाखाली डेव्हलपर्सने ही खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या कामात काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी कंपनीला मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वांद्रे येथील हा प्रकल्प २००० साली सुरू करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्धीकी म्हाडाचे अध्यक्ष होते. या प्रकल्पवार विकासक म्हणून पिरॅमिड डेव्हलपर आणि आर्किटेक्ट म्हणून मे. निओ मॉडर्न आर्किटेक्ट्स यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी जादा एफएसआय मिळवण्याच्या नादात संबधित कंपनीने बांधकाम करताना नियमांचं उल्लघंन केलं.
एवढ्यावरच न थांबता कंपनीने २०१२ मध्ये या प्रकल्पातील ३३ फ्लॅट्स बोगस कागदपत्रांच्या आधारे लाटली होती. त्यात संशयित आरोपींनी वांद्रे पश्चिमेकडील जमात-ए-जमुरिया सहकारी गृहनिर्माण संस्थेला मंजुरी मिळवण्यासाठी रेशन कार्ड, फोटो पास, दुकाने-आस्थापना परवान्याची खोटी कागदपत्रे सादर केली होती. ही सर्व बोगस कागदपत्रे झोपडपट्टी पुनर्विकास मंडळाच्या कार्यालयात मंजुरी मिळण्याच्या उद्देशाने सादर केल्याचं 'ईडी'ने म्हटलं आहे.
या प्रकरणी काही सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी २०१४ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता या गुन्ह्याचा तपास पुढे अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने समांतर सुरू केला.
त्यानुसार मागील वर्षी 'ईडी'ने मार्चमध्ये या कंपनीच्या विविध मालमत्तांचा तपास केला. या मालमत्तांमध्ये तात्कालिन काँग्रेस आमदार बाबा सिद्धीकीचा संबंध आढळून आल्यानंतर ईडीने बाबा सिद्दीकी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर बाबा सिद्धीकी यांची चौकशी केली होती.
हेही वाचा-
वर्षभरात विमानतळावरून १०७ कोटींचं सोनं जप्त