एका साडेतीन महिन्याच्या मुलीचा तिच्या आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या काळाचौकी परिसरातील घटना असून, या घटनेचा खुलासा झाला तेव्हा एक धक्कादायक बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, २ दिवसांपूर्वी काळाचौकीमधून साडेतीन महिन्याची मुलगी गायब झाल्याची पोलिसात तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा पोलिसांनी तपास केला असून, या मुलीला कुणीही पळवून नेले नसून तिच्या आईनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
हे सून्न करणारे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. सपना मकदुम (२९) असे या आईचे नाव आहे. सपनाला अगोदर एक मुलगी होती. मात्र, दुसरीही मुलगी झाल्यामुळं तिने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ही धक्कादायक घटना काळाचौकी फेरबंदर परिसरातील संघर्ष सदन इमारतीत घडली.
कपड्यांच्या बदल्यात भांडी विकणारी महिला डोळ्यावर स्प्रे मारून बेशुध्द करून मुलीला पळवून घेऊन गेली असा बनाव आईने रचला होता. यामुळे काळाचौकी परिसरात खळबळ माजली होती. आपल्याच मुलीचा जीव घेऊन या आईने बनाव रचून सर्वांची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
एक अनोळखी महिला बास्केट विकण्याच्या बहाण्यानं आली होती. जुन्या मोबाईल देऊन बास्केट विकण्याचं काम ती करत होती. आपल्या इमारतीत येऊन या महिलेनं बास्केट विकण्यासाठी आपल्याकडे जुन्या मोबाईलची मागणी केली. मला नवे बास्केट घ्यायचे होते. माझ्याकडे एक जुना मोबाईल होता. तो मोबाईल शोधण्यासाठी मी आतील खोलीत गेल्यानंतर हीच संधी साधत खाटेवर असलेल्या बालिकेला त्या अज्ञात महिलेने उचलले आणि ती पसार झाली, असे सपना मकदुम हिने सांगितले. मात्र, पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.