क्वारी रोड - भांडुपमधील एका कचराकुंडीत मंगळवारी सकाळी सहा महिन्यांचं मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भांडुप पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कचरा टाकण्यासाठी गेलेल्या एका रहिवाशाला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास हे अर्भक दिसलं. त्यानं तात्काळ याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळी पोहचलेल्या भांडुप पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत ते मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृतदेह शवविच्छेदानासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आलं. क्वारी रोड परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास सुरू केला आहे.