18 वर्षीय तरुणीने (teenage girl) राहत्या घरातील बाथरुममध्ये बाळाला जन्म देताना आपला जीव गमावला. मुलीच्या पालकांच्या आरोपानुसार वाशी पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन (shrivardhan) येथील तिच्या कथित प्रियकरावर एफआयआर नोंदवला आहे.
यावर्षी जून महिन्यातच मुलगी 18 वर्षांची झाली होती. मे महिन्यात मुलगी आई आणि दोन लहान भावांसह वडिलांकडे राहण्यासाठी वाशीला (vashi) आली होती. शाळा सुरू झाल्यानंतर तिची आई आणि भावंडे जूनमध्ये श्रीवर्धनला परत गेले. तर बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलीने वाशीमध्ये वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. वडील मुंबईत कारागीर म्हणून काम करायचे.
19 जुलै रोजी, तिच्या वडिलांनी फोन केल्यानंतर तिने उत्तर दिले नाही. त्यामुळे वडिलांनी शेजाऱ्याला फोन करून तपासण्यास सांगितले. शेजाऱ्याने काही महिलांसह दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना ती मुलगी बाथरूमच्या फरशीवर पडलेली दिसली आणि तिच्या पायाजवळ नवजात बाळ दिसले.
शेजाऱ्यांपैकी एकाने सांगितले की, त्यांच्यासोबत एक महिला होती जी नर्सिंगमध्ये पारंगत होती आणि तिने तिची नाळ कापली आणि नंतर बाळाच्या पाठीवर थाप मारली. त्यानंतर बाळ रडू लागले. त्यानंतर मुलीला आणि बाळाला दोघांनाही वाशीच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे मुलीला मृत घोषित करण्यात आले. तसेच अवघ्या 2 किलो वजनाच्या बाळावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान 21 जुलै रोजी बाळाचेही निधन झाले.
मुलीचे कुटुंब आणि शेजाऱ्यांनी दावा केला आहे की, तिच्या गर्भधारणेबद्दल कोणालाही माहिती नव्हती. तसेच बाळाचा जन्म वेळेआधीच झाला असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
"मुलगी सकाळपासून कॉलला उत्तर देत नसल्यामुळे तिची प्रसूती सकाळी 11च्या सुमारास झाली असावी असा आम्हाला संशय आहे.," असे वाशी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर आई आणि तिची भावंडेही वाशीला आली.
“मुलीने पालकांना श्रीवर्धनमध्ये झालेल्या अफेअरबद्दल माहिती दिली होती. मुलीच्या आईने दावा केला आहे की ते त्यांच्या मुलीला वाशीला घेऊन आले होते जेणेकरून तिला कुठेतरी नोकरी मिळेल. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.
बारावीनंतर ती श्रीवर्धनमध्येच कॉम्प्युटर कोर्ससाठी गेली होती आणि तेव्हाच तिचे जवळपास 23 वर्षे वयाच्या मुलाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तो नोकरीला होता की नाही हे आईला माहीत नाही,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवला असून पुढील तपासासाठी आरोपी आणि जन्मलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीसाठी हे प्रकरण श्रीवर्धन पोलिसांकडे सुपुर्त केले आहे. मुलीच्या कथित प्रियकरावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा