मुंबईच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी, तसेच पर्यावरण संतुलनासाठी महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला, पवई, बोरिवली येथील तब्बल 4 एकर भूखंडावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर सुमारे 3.5 हजार झाडांचे पारंपरिक पद्धतीने रोपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पर्यावरणाला बसत आहे. विकासकामांआड येणाऱ्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. दरम्यान, पर्यावरणाशी समतोल साधत विकासकामांवर भर देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे.
महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत वेळोवेळी वृक्षारोपण केले जाते. वृक्षसंपदेत वाढ व्हावी यादृष्टीने गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी वृक्षलागवडीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आता लवकरच महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल 4 एकर भूखंडावर पारंपरिक पद्धतीने 3.5 हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे.
याबाबत राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यांनतर प्रत्यक्ष वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात येणार आहे.