टिक टाॅकच्या नादात घर सोडलेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी केली 'घर वापसी'

सोशल मिडियावरील टिक टाॅकवर प्रसिद्ध रियाजची ती मोठी फॅन होती. दिवसभर ती आईच्या मोबाइलवर रियाजचेच व्हिडिओ पहायची. यावरून वडिलांसोबत तिचे वांरवार खटके उडायचे.

टिक टाॅकच्या नादात घर सोडलेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी केली 'घर वापसी'
SHARES
टिक टॉक या सोशल मीडिया अॅपवर प्रसिद्ध असणाऱ्या रियाज अलीच्या प्रेमासाठी घर सोडलेल्या १४ वर्षीय मुलीची समजूत काढून मुंबईच्या वडाळा पोलिसांनी तिची घरवापसी केली आहे. रियाजच्या कार्यक्रमासाठी ती नेपाळला जाण्यासाठी निघाली होती. मुलीच्या कुटुंबियांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत.


रागातून घर सोडलं

शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी  मुलगी सध्या दहावीला आहे. सोशल मिडियावरील टिक टाॅकवर प्रसिद्ध रियाजची ती मोठी फॅन होती. दिवसभर ती आईच्या मोबाइलवर रियाजचेच व्हिडिओ पहायची. यावरून वडिलांसोबत तिचे वांरवार खटके उडायचे. यातून वडिलांसोबत तिने मागील ३ महिन्यांपासून बोलणेही बंद केले. तिच्या आईचाही मोबाइल वडिलांनी बंद केला. वडिलांचा राग मनात धरून अखेर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडून टिक टाॅक शो वर प्रसिद्धधी मिळवून ती रियाज, विष्णूप्रियाप्रमाणे मोठी होण्याची स्वप्न उराशी बाळगून होती. १ जून च्या पहाटे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.


पहाटेच घरातून बाहेर

त्याचदरम्यान रियाजचा दिल्ली आणि नेपाळमध्ये शो असल्याची माहिती तिला तिच्या मैत्रिणीने दिली. रिजायच्या शो ला जाण्यासाठी  घरातून पळून जाण्यासाठी १ जोडी कपडे आणि घरातील ५ हजार रुपये जवळ ठेवले होते. १ जूनच्या पहाटे ४.३० वाजताच घरातील इतर सदस्य झोपेेेत असताना घराबाहेर पडली. शिवडी रेल्वे स्थानकावरून ती सीएसटीला गेली. तेथे तिने दिल्ली आणि यूपीला जाणाऱ्या एक्सप्रेसची चौकशी केली.  त्यावेळी तिला सीएसटीहून एकही गाडी या राज्यात जाण्यासाठी सुटत नसून त्या गाड्या कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटतात असे सांगितले. 


४ पथकांकडून शोध

त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनल गाठत गोरखपूरला जाणाऱ्या ६.१५ वाजताच्या एक्सप्रेसला ती बसली. मुलगी कुठेही आढळून येत नसल्यामुळे घरातल्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यांनी वडाळा पोलिसात मदतीसाठी धाव घेतली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी मुलीच्या शोधासाठी ४ पथके कामाला लावली.


मोबाइल लोकेशन ट्रेस

मुलीच्या मैत्रिणीच्या चौकशीत ती टिक टाॅकवरील सेलिब्रिटी रियाजची फॅन असल्याचे पुढे आले. त्याचा शो दिल्लीला होणार असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी दिल्लीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये शोध घेतला. तिने आईचा मोबाइल नेला होता. पोलिसांनी लोकेशन केले. यावेळी खांडवा या ठिकाणी तिचे लोकेशन दाखवले. त्यावेळी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी माने यांनी तिच्या  मोबाइलवर फोन करत, तिच्याशी संपर्क साधला. कशीबशी माने यांनी तिची समजूत काढत तिला खांडवा स्थानकावर उतरण्यास भाग पाडले. दुसरीकडे वडाळा पोलिसांनी खांडवा येथील आरपीएफ पोलिसांशी संपर्क साधत मुलीच्या सुरक्षेबाबत आधीच सांगितले होते.  आरपीएफ पोलिसांनी तिचा ताबा घेत तिला बालसुधारगृहात ठेवले. दुसऱ्या रविवारी वडाळा पोलिसांनी खांडवा येथून मुलीचा ताबा घेत सोमवारी तिच्या घरातल्यांकडे सुखरूप सूपूर्द केले. सात तासात शोध घेत मुलीला सुखरूप आणल्याने मुलीच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.



हेही वाचा -

धारावी कोठडीतील मृत्यू प्रकरणाची एमएसपीसीएने घेतली दखल

सोनसाखळी चोरांनी चोरीचा पॅटन बदलला, दुचाकीची जागा घेतली रिक्षाने





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा