मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात रात्री गोळीबाराचा थरार पाहायला मिळला आहे. सोनं घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यावर दरोडेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयानजीकच्या पी डिमेलो रोडवर एका सोन्याच्या व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या 3 दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार करत त्याच्याकडील सोन्याची बॅग हिसकावून पळ काढला.
गोळीबारामध्ये व्यापाऱ्याच्या पायाला गोळी लागली. या गोळीबारामध्ये अंगडीया नावाचा व्यापारी जखमी झाला असून त्याच्यावर सध्या सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. चोरीच्या उद्देशानेच हा गोळीबार केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा