विनाहेल्मेट दुचाकी चालवून गोरेगावच्या एसव्ही रोडवरील सिग्नल मोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाहतूक नियम मोडून देखील जाब विचारणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराला खडसावणाऱ्या या पोलिस उपनिरीक्षकाच्या बेजबाबदार वर्तनाची दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. ७०० रुपयांचा दंड ठोठावून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित पोलीस उपनिरीक्षक मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागात नेमणुकीस आहेत.
ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर Rev It Up (@BhatkarHardik) या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओत एक पोलीस उपनिरीक्षक विना हेल्मेट घालून दुचाकी चालवताना दिसत आहे. तसंच राम मंदिर येथील एक सिग्नल मोडून पुढं जाताना दिसत आहे. दुसऱ्या एका दुचाकीस्वाराने हा सर्व प्रकार पाहिल्यावर त्याने संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तुमचं हेल्मेट कुठं आहे? तुम्ही सिग्नलही मोडला, असं विचारल्यावर मला जाब विचारायचा तुला अधिकार नाही, असं उद्धट उत्तर पोलीस उपनिरीक्षकाने त्याला दिलं.
हा सर्व प्रकार या दुचाकीस्वाराने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला तसंच सोशल मीडियावरही व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने या व्हिडिओची दखल घेत हेल्मेट न वापरणे तसंच सिग्नल मोडल्याबद्दल ई चलन पाठवून त्यांच्याकडून ७०० रुपयांचा दंड वसूल केला. तसंच गैरवर्तनाबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-
मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपीला पाहिजे सुरक्षा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
मुंबईत व्हायला आला हिरो, बनला चोर!