मागील काही दिवसांपासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट होत आहे. मात्र, कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून रुग्णसंख्या वाढू नये याबाबत पालिका दक्ष आहे.
संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या कालावधीत परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुकाने उघडी राहणार नाहीत याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तसंच दुकाने खुली असलेल्या सकाळी ११ वाजेपर्यंतच्या वेळेत जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार नाही आणि घराबाहेर आलेले नागरिक मास्क, सुरक्षित अंतर या नियमांचे पालन करतील याकडंही लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मॉर्निंग वॉक अथवा इव्हिनिंग वॉकला संचारबंदीच्या कालावधीत प्रतिबंध असून त्यासाठी घराबाहेर पडणा-या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसंच त्यांची ॲन्टिजन टेस्टही करण्यात येत आहे.
संचारबंदी सुरु झाल्यापासून २३ मे पर्यंत महापालिकेची ३१ विशेष दक्षता पथके आणि विभाग कार्यालय स्तरावरील ८ पथके यांनी पोलीस विभागाच्या सहकार्याने संचारबंदीच्या तसंच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५८६३ नागरिक आणि दुकानदारांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६९ लाख १ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
त्यामध्ये विशेष दक्षता पथकांनी १२४१६ नागरिक आणि दुकानदार यांच्याकडून ५३ लाख ६६ हजार ७०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. तर एपीएमसी मार्केटमधील दक्षता पथकांनी ३१८७ नागरिक तसंच दुकानदारांकडून ९ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या कालावधीत विभाग कार्यालय स्तरावरील विभागीय दक्षता पथकांनी ३४४७ नागरिक आणि दुकानदार यांच्याकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यापोटी १५ लाख ३५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ५४४८९ नागरिक आणि व्यावसायिक यांच्यावर कारवाई करीत २ कोटी ५० लाख ७ हजार ६०६ इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा -