जोगेश्वरी - एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सिद्धेश मिठबावकर असं या 19 वर्षीय तरुणाचे नाव असून, तो इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिकतो. सिद्धेशचे त्याच्याच विभागात राहणाऱ्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे सिद्धेश तिच्यावर कुणाशी बोलू नको, रात्री ऑनलाइन राहू नको अशा पद्धतीने अरेरावी करत होता. यावरून अनेकदा या दोघांमध्ये वाद देखील झाले होते.
ही तरुणी कराड येथे पुढील शिक्षणासाठी गेली असता सिद्धेशनं तिचा फोटो हॉट वे या अश्लिल साईटवर अपलोड करून खोटे अकाऊंट बनवले आणि तिचा नंबर, घरचा पत्ता देखील त्यात नमूद केला. यामुळे या युवतीच्या घरी अनोळखी तरुणांचे येणे-जाणे वाढले. मात्र हा सर्व प्रकार सिद्धेशने केल्याचं उघड समजताच या तरुणीने त्याच्या विरोधात सोमवारी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान सिद्धेशचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी सांगितले.