चोरीचा माल खपवण्यासाठी अाणि अापण पकडले जाऊ नये, या भीतीपोटी अट्टल चोर काय-काय शक्कल लढवतील, याचा नेम नाही. चोरीचा असाच एक प्रकार जोगेश्वरी परीसरात उघडकीस आला आहे.
आलम शेख (३२) हा भंगारातील गाड्या कमी किंमतीत विकत घ्यायचा अाणि त्याचा चेसी नंबर चोरीच्या गाड्यांना लावत या वाहनांची विक्री काही लाखांत करायचा. हा जणू त्याचा रोजचा धंदाच बनला होता. पण अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी आलमची पोलखोल करत त्याच्याकडील ४ कार जप्त केल्या अाहेत. या टोळीने शेकडो कार चोरून विकल्याचा पोलिसांना संशय अाहे.
जोगेश्वरी परिसरात राहणारा आलम शेख हा पूर्वी गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून कामाला होता. त्यामुळे चारचाकी वाहनांबद्दल त्याला चांगलीच माहिती झाली होती. रस्त्यावरील कार चोरून पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने एक नामी शक्कल लढवली होती. अपघात झालेल्या गाड्या या विक्रीसाठी भंगारात येतात. या भंगारवाल्यांना चिरीमिरी देत आलम भंगारात आलेल्या गाड्यांचे चेसी आणि इंजिन नंबर घ्यायचा. त्यानंतर त्याच रंगाची आणि कंपनीची कार आलम चोरुन गॅस कंटेनरने त्या गाडीवरील चेसी आणि इंजिन नंबर खोडून भंगारमध्ये निघालेल्या गाड्यांचे नंबर टाकून त्या गाड्या काही लाखांत विकायचा, हा त्याचा नित्यक्रम बनला होता.
यासाठी त्याने लोखंडावर नंबर टाकण्याचा साचाही बनवून घेतला होता. अशाच प्रकारे त्याने मुंबईसह नवीमुंबई आणि ठाणे परिसरातून अनेक कार चोरल्याचा संशय पोलिसांना आहे.
आलमच्या या क्लुप्तीची माहिती अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांना मिळाली. अखेर एका कार चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी आलमला ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४ कार जप्त केल्या आहेत. यासह अन्य कार चोरीचे गुन्हे आलमच्या चौकशीतून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -