सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते.
कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३० च्या सुमारास गेले होते. तिथे ११.३० तासांच्या चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा वाझे यांना अटक करण्यात आली. सचिन वाझेंवर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी आरोप होत आहेत. एनआयए सध्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. वाझे यांनी शुक्रवारी संध्याकाळी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा जामीन ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला. प्रथम दर्शनी वाझे यांच्या विरोधात पुरावे असून त्यांची कोठडीत घेऊन चौकशी होणे गरजेचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं.
एनआयएच्या आधी १२ तारखेला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सचिन वाझे यांची दहा तास चौकशी केली होती. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली होती.
अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले.