उल्हासनगरमध्ये एका मादी कुत्रीला आणि तिच्या लहान पिल्लाला फाशी देऊन ठार मारण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी प्राणिमित्र संघटनांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅम्प नंबर ५च्या साईनाथ कॉलनी शनी मंदिराजवळ १६ मार्चच्या रात्री एक अमानुष आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अज्ञात व्यक्तीनं एका मादी कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला झाडाला लटकवून गळफास देऊन जीवे ठार मारले.
प्रत्यक्षदर्शींनी सर्व प्रकार प्राणीमित्र संघटना सांगितला. शिवाय पीपल्स फॉर एनिमल ग्रुप या व्हाट्सअपग्रुप वर देखील मेसेज फिरू लागले. यातील एक शिक्षिका आणि प्राणीमित्र श्रुष्टी चुग यांना एक व्यक्तीनं झाडाला दोन कुत्र्यांना लटकवण्यात आल्याची माहिती दिली. मात्र रात्रीचा वेळ असल्यानं त्या जाऊ शकल्या नाहीत.
मात्र १७ मार्चच्या सकाळी जाऊन चुग यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहिले असता एक मादी कुत्री आणि पिल्लू त्यांना मृतावस्थेत आढळून आले. या दोन्ही कुत्र्याच्या गळ्या भोवती कापडानं अवळल्याच्या खुणा होत्या. शिवाय त्यांचे पाय हे तारेनं बांधण्यात आले होते.
दरम्यान आता या प्रकरणी सृष्टी यांच्या तक्रारीनंतर उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि भादवी ४२९ नुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. या भागातील सीसीटीव्ही आणि इतर प्रत्यक्षदर्शींची आरोपीला पकडण्यासाठी मदत घेतली जात आहे.
हेही वाचा