पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करण्याच्या हेतूने काही दिवसांपूर्वी बालभारतीद्वारे 'ई-पुस्तकां'चा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) बोर्डाच्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात पुस्तके प्राप्त करून देण्यात आली आहेत. दरम्यान, बालभारती व सीबीएसईच्या या अनोख्या उपक्रमामुळे ऐनवेळी मुलांसह पालकांची होणारी तारांबळ थांबणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे (एनसीईआरटी)ने पुढाकार घेतला आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी पुस्तके विकत घेतल्यानंतर शाळेने सुचवलेल्या प्रकाशनाचे पुस्तक नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या पुस्तकाची संपूर्ण माहिती एनसीईआरटीच्या पोर्टलवर उपलब्ध असल्याने पालक व शाळेतील शिक्षक संपूर्ण चौकशी केल्यानंतर पुस्तके खरेदी करू शकतात.
सर्वप्रथम http://epathshala.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर तुम्ही e-pathshala यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर e-textbook हा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवा तो विषय, इयत्ता व प्रकाशनाचे नाव टाकून पुस्तक उपलब्ध होईल.
बालभारतीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत एनसीईआरटीने पुस्तके डाऊनलोड करण्याची सुविधाही वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. आता प्रत्येक विद्यार्थी व पालकांच्या हातात स्मार्टफोन असल्याने या उपक्रमाचा शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच फायदा होणार आहे.
हेही वाचा