मराठी आणि गुजराती बहुभाषिक परिसर असलेल्या दहिसरमधील गुजराती आणि मराठी माध्यमाची शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहिसर (पू.) येथील एस.व्ही. रोडच्या पर्वतनगरमध्ये होली फॅमिली ही शाळा आहे. काही दिवसांपूर्वी शाळा व्यवस्थापनाने गुजराती माध्यमाची शाळा बंद केली होती. त्यानंतर अचानक 29 एप्रिलला मराठी माध्यमाची शाळा देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी माध्यमाचे 12 शिक्षक शाळेतच बसून राहिले. मराठी माध्यमाची शाळा बंद केल्याने हे शिक्षक नाराज आहेत. त्यावेळी दहिसर पोलीस शाळेत पोहचले असता शाळा व्यवस्थापन मराठी माध्यमाच्या विरोधात असल्याने अचानकपणे मराठी शाळा बंद केल्याचा आरोप या शिक्षकांनी केला. तसेच आम्ही जायचे कुठे? असा प्रश्न देखील या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शिक्षकांचे म्हणणे आहे की, मराठी माध्यमांचा प्रवेश येत असनाही प्रवेश घेतला जात नव्हता. तसेच त्याबाबत काहीही सांगितले जात नसल्याचा आरोप देखील या शिक्षकांनी केला आहे.