'ऑनलाईन असेसमेंटसाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान योग्य आहे. पण हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षित माणसे हवीत', असं खुद्द न्यायालयानेच म्हटलंय. मुंबई विद्यापीठाने ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाल्याची माहिती न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाने हे मत नोंदवले.
'निकालावेळी विद्यापीठात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान योग्य होते. पण ते तंत्रज्ञान टप्पाटप्प्याने वापरायला हवे होते. जेणेकरून निकालावेळी झालेला गोंधळ टळला असता. याशिवाय हे नवीन तंत्रज्ञान हाताळणारी माणसेही प्रशिक्षित हवी होती', अशा शब्दांत न्यायालयाने विद्यापीठाला सुनावले. त्याचबरोबर असा गोंधळ पुन्हा होऊ नये यासाठी भविष्यात काय खबरदारी घेणार? याला कोण कारणीभूत आहेत? हा गोंधळ नेमका कशामुळे झाला? याविषयी खुलासा करण्यास सांगितले आहे.
या आधी विद्यापीठाने दिलेल्या डेडलाईन विद्यापीठालाच पाळता आल्या नाहीत. त्यामुळे या ऑनलाईन असेसमेंटचा त्रास सहन कराव्या लागलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने दिलेली ६ सप्टेंबर ही डेडलाईन पाळणेही विद्यापीठाला शक्य झाले नाही. त्यावेळी कोर्टात विद्यापीठाने न पटणारी कारणेही दिली. जास्त पाऊस, गणपती, अनंत चतुर्दशी, ईद, सुट्टी अशी अनेक करणे विद्यापीठाने कोर्टात दिली. त्यानंतर न्यायालयाने १९ सप्टेंबर ही डेडलाईन दिली. घाईघाईत का होईना, पण विद्यापीठाने ही डेडलाईन पाळली.
न्यायालयाने विद्यापीठाला या निकालाबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठ संबंधितांवर कारवाई करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. उत्तरपत्रिका तपासणी वेळी उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग नीट न करणे, उत्तरपत्रिका गहाळ होणे, त्याचा परिणाम निकालावर दिसून आला. त्यामुळे अनेक निकाल उशिरा लागले. अद्याप अनेक निकाल बाकी आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
अद्याप अशा प्रकारची कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या पूर्ण लक्ष उर्वरीत निकाल लावण्याकडे आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निकालात झालेल्या गोंधळासाठी संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी. ऑनलाईन असेसमेंटचे काम मेरिट लिस्ट या कंपनीला देण्यात आलेले. या कंपनीला याचा कोणताही अनुभव नसताना हे काम देण्यात आले. त्यामुळे कुलगुरू संजय देशमुख यांच्याबरोबरच या संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई व्हावी.
अॅड. अमोल मातोले, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)