कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या रुग्णांचा आलेख घसरल्यानंतर राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. २४ जानेवारीपासून मुंबईतील विविध माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या. त्यानंतर आता या सर्व शाळांतील इयत्ता १ली ते ८वीच्या वार्षिक परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेनं याबाबत निर्णय घेतला असून शहरातील सर्व शाळांना हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थी अजूनही प्रत्यक्ष शाळेत हजर राहत नाहीत. त्यामुळं दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. जे पालक मुलांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरीता दृकश्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवण्याचेही आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या साडेसहा लाख आहे. मात्र बहुतांशी पालकांनी फेब्रुवारीतही संमतीपत्र दिले नव्हते. तर काही ठिकाणी संमतीपत्र देऊनही विद्यार्थी हजर राहत नाहीत. त्यातच एका बाजूला दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घ्याव्यात की अप्रत्यक्ष यावरून वाद सुरू असताना आता पहिली ते आठवीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेतल्या जाणार आहेत.
२ वर्षांनी परीक्षा प्रत्यक्ष होणार आहेत. जे विद्याथ्र्यी ऑनलाईन उपस्थित राहात आहेत त्यांची परीक्षा फक्त ऑनलाईन पध्दतीने होईल अशी माहिती मिळते.