Advertisement

NEET परीक्षेसाठी बुटांना परवानगी नाही, सॅण्डल-चप्पल घाला!


NEET परीक्षेसाठी बुटांना परवानगी नाही, सॅण्डल-चप्पल घाला!
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने लवकरच होणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) या परीक्षेकरता नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीप्रमाणे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पोशाखाचं बंधन घालण्यात आलं आहे. येत्या ६ मे रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना 'नीट'च कपडे घालून जावं लागणार आहे!


या नवीन नियमावलीमध्ये काय?

'नीट'च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना फिकट रंगाचे कपडे परिधान करण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना फुल शर्ट, कुर्ता आणि पायजामाही वापरता येणार नाही. त्याशिवाय विद्यार्थ्यांना कपड्यांवर मोठ्या आकारातील बटन्स, बॅच किंवा फूल लावता येणार नाही. तसेच त्यांना जीन्स, शर्ट असे कपडेही परिधान करता येणार नसून बुटही घालता येणार नाहीत. त्याऐवजी विद्यार्थ्यांना सॅंडल किंवा चप्पल घालण्यास सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थिनींना शक्यतो पारंपरिक सलवार कमीज किंवा ट्राऊजर वापरता येणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे दागिने घालून परीक्षेला बसता येणार नाही. दरम्यान हिजाब तसेच बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी पारंपरिक पोशाख घालणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेच्या एक तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे. शिवाय पारंपारिक पोशाख घालणाऱ्या विद्यार्थ्यांची केंद्रावर तपासणी केली जाणार आहे.


परीक्षार्थींच्या सामानासाठी सुविधाच नाही!

दरम्यान परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपास, पिन, कॅल्क्युलेटर अशी कोणतीही साधनं आपल्याबरोबर आणता येणार नाहीत. याव्यतिरिक्त परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींचे सामान ठेवण्याची कुठलीही सुविधा नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गॉगल्स, वॉलेट, पाऊच, हँडबॅग, बेल्ट, रुमाल अशा वस्तू नेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची संवादाची तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स साधने घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.


मेडिकल प्रवेशासाठी 'नीट' परीक्षा

मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी 'नीट' परीक्षा घेतली जाते. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून यंदाच्या या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसणार आहेत. दरम्यान गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही परीक्षेत कुठल्याही प्रकारे कॉपीचे प्रकार होऊ नयेत म्हणून हा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.


हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध

येत्या ६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सुट्टी असल्या तरी देखील परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं सीबीएसईद्वारे सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा 

'प्रॅक्टिस पोर्टल'वर या! MHTCET, JEE, NEET परीक्षांचा सराव करा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा