कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनामुळं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळं आणि राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आल्यानं शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतत घोषणा केली आहे. लॉकडाऊनपूर्वी २१ मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता. मात्र २३ मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता.
दहावीच्या भूगोलाच्या पेपरसह नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचं सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळणार असल्याची माहिती मिळते. याआधी, शिक्षण विभागानं पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.