मुंबईसह राज्यातील नऊ आर्ट महाविद्यालयात प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा १३ मे रोजी ही परीक्षा होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक हजाराने वाढली आहे.
दरम्यान, राज्यातील नऊ कॉलेजांमध्ये फक्त ६५० जागा असून आलेल्या एकूण अर्जांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कला महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट तसेच अप्लाइड आर्ट कॉलेजांसह राज्यभरातील नऊ आर्ट कॉलेजांचे प्रवेश हे राज्य सीईटी सेलकडून घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षांच्या गुणांनुसार दिले जातात.
१३ मे रोजी होणारी ही परीक्षा आर्ट कॉलेजांमधील पेंटिंग, स्कल्प्चर, मेटल ग्राफ, इंटेरियर डेकोरेशन, सिरॅमिक पोट्रेट, अल्पाइड आर्ट आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने सीईटीच्या परीक्षा केंद्रातही वाढ करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी आर्ट सीईटीसाठी राज्यात फक्त १५ केंद्रे होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय सीईटी परीक्षेत पेंटिंगसारख्या प्रॅक्टिकल गुणांचा विचार केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना साहित्याची ने-आण करण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे यंदा शासनाने ११ केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कलात्मक करिअरमध्ये निर्माण झालेल्या संधींमुळे विद्यार्थ्यांचा ओढा या क्षेत्राकडे वाढला आहे. परिणामी, प्रत्येक वर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीसाठी विद्यार्थीसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
- डॉ. राजीव मिश्रा, कला संचालक
हेही वाचा -