चुरशीच्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेनं १० पैकी १० जागा जिंकत १०० टक्के मार्क्स मिळवले आहेत. खुल्या प्रवर्गातील ५ आणि राखीव प्रवर्गातील ५ अशा एकूण १० जागा काबीज करत युवासेनेनं सिनेट निवडणुकीत भगवा फडकवला. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (अभाविप) सोबत युवासेनेची खरी टक्कर होती. या लढतीत युवासेनेनं अभाविपला चारी मुंड्या चित केलं आहे.
या विजयामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शिवसेना भवन इथं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा विजयोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. हा विजय युवासेनेचा आहे, गेल्या ८ वर्षांत आम्ही जे काम केलं त्या कामाचा विजय आहे, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी आता अधिक जोमानं चांगलं काम करू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.
या आधी सिनेटच्या १० जागांपैकी ८ जागा युवासेनेच्या ताब्यात होत्या, तर २ जागा मनविसेच्या ताब्यात होत्या. पण यंदा मनविसे सिनेट निवडणुकीत न उतरल्यामुळे केवळ युवासेना आणि अभाविप आमने-सामने होत्या. २५ मार्च रोजी ५३ मतदान केंद्रावर १० जागांसाठी मतदान झालं. मंगळवारी, २७ मार्चला मतमोजणीला सुरूवात झाली नि बुधवारी रात्री उशीरा सर्व निकाल हाती आले.
या निकालानुसार १० जागा युवासेनेनं जिंकल्या. खुल्या प्रवर्गातून महादेव जगताप, प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, सुप्रिया करंडे आणि मिलिंद साटम हे युवासेनेचे उमेदवार विजयी झाले. तर राखीव प्रवर्गातील अनुसूचित जाती प्रवर्गातून निखिल जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विमुक्त-भटक्या जमाती प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागास प्रवर्गातून राजन कोळंबेकर आणि महिला प्रवर्गातून शितल देवरूखकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
युवासेनेचे विजयी उमेदवार आणि युवासेना आता आणखी झपाट्यानं काम करणार असल्याचं सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी कल्याण आणि ठाण्यात विद्यापीठाची उपकेंद्रे सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. आज जो विजयी गुलाल सर्वत्र दिसतोय तो गुलाल २०१९ मध्येही दिसेल, असंही आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
सिनेट निवडणूक: पदवीधर मतदान केंद्राच्या शोधात