मुंबईतील माहुल गावात वायू प्रदूषणाचे संकट पाहून बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना २८६ कोटी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला आहे. माहुल गावातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी या दंडातून रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
माहुल हे ईशान्य मुंबईतील जुने गाव आहे. या ठिकाणी मोठ्या ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आहेत. कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी माहूल आणि आंबापाडा गावातील रहिवाशांनी २०१४ मध्ये हरित लवादाकडे केल्या होत्या. याची दाखल घेत माहुल गावातील एजिक लॉजिस्टिक, एचपीसीएल, बीपीसीएल आणि सी लॉर्ड या चार कंपन्यांना पुढील पाच वर्षात एकूण २८६ कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहे. कुठल्या कंपनीतून किती अस्थिर सेंद्रिय रसायने बाहेर पडली आणि त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन दंडाची रक्कम ठरवण्यात आल्याचे हरित लवादाकडून सांगण्यात आले.
या चार कंपन्यांच्या रासायनिक उद्योगामुळे आणि रासायनिक उत्पादनांच्या हाताळणीमुळेच प्रामुख्याने प्रदूषण होत असल्याचे नाकारता येणार नाही. त्यामुळे रहिवाशांना फुप्फुसांचे गंभीर आजार जडले आहेत. काही वेळा तर परिसरात गॅस चेंबरसारखी स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे', असे निरीक्षणही लवादाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.
कोणाला किती दंड?
एजिक लॉजिस्टिक – १४२ कोटी रुपये
एचपीसीएल – ७६.५ कोटी
बीपीसीएल – ६७.५ कोटी
सी लॉर्ड – २० लाख
हेही वाचा