मुंबई - रंगाचा सण रंगपंचमी. अनेकांनी रंगांची उधळण करत हा सण साजरा केला असेल. पण चर्चगेट, कफ परेड आणि कुलाबा परिसरातील राहिवाशांनी मात्र अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली आहे. झाडांवर 'सेव्ह ट्री'चे पोस्टर लावत मुंबईकरांमध्ये मेट्रो 3 मध्ये बाधित होणारी झाडे वाचवण्यासाठी त्यांनी जनजागृती केली.
मेट्रो 3 मधील झाडे वाचवण्यासाठी 'सेव्ह ट्री' ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जो लढा सुरु केला आहे त्याला जनाधार मिळावा, मोठ्या संख्येने मुंबईकर यात सामील व्हावेत आणि झाडांची कत्तल थांबावी यासाठी 'सेव्ह ट्री पोस्टर' मोहीम सोमवारी राबविल्याची माहिती 'सेव्ह ट्री'च्या नीरा पूंज यांनी दिली आहे. चर्चगेट स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला ही झाडे कापली जाणार असल्याचे कळावे आणि तेही झाडे वाचवण्यासाठी पुढे यावेत हा यामागचा उद्देश आहे. चर्चगेट स्थानकाबाहेरील जे टाटा रोडवरील 100 झाडांसह कफ परेड आणि कुलाबा येथील झाडांवर 'सेव्ह ट्री'चे पोस्टर यावेळी लावण्यात अाले.