Advertisement

'एक गाव एक गणपती' संकल्पना राबवणारं आदर्श गाव

पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानं पाणी प्रदूषित होतं. पण नवी मुंबईतल्या एका मंडळानं यावर उपाय म्हणून एक भन्नाट संकल्पना राबवली आहे. गणपती उत्सव इको फ्रेंडली पद्धतीनं कसा साजरा करायचा याचं उत्तम उदाहरण नवी मुंबईतल्या आग्रोळी गावानं दिलं आहे.

'एक गाव एक गणपती' संकल्पना राबवणारं आदर्श गाव
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. १० दिवस भक्ती भावानं बाप्पाची सेवा केली जाते. त्यानंतर जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जनानंतर मात्र दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीची झालेली अवहेलना पाहवत नाही. इको फ्रेंडली नसल्यामुळं बाप्पाच्या अनेक मूर्तींचं विघटन होत नाही आणि मूर्तींचे अवशेष समुद्रकिनारी पाहायला मिळतात.

यासोबतच मोठ्या संख्येनं पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानं पाणी प्रदूषित होतं. पण नवी मुंबईतल्या एका मंडळानं यावर उपाय म्हणून एक भन्नाट संकल्पना राबवली आहे. गणपती उत्सव इको फ्रेंडली पद्धतीनं कसा साजरा करायचा याचं उत्तम उदाहरण नवी मुंबईतल्या आग्रोळी गावानं दिलं आहे.



वर्षानुवर्षांची परंपरा

लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव बेलापूरच्या आग्रोळी गावात पाहायला मिळतो. या गावात एकच गणेशोत्सव साजरा केला जातो. एक गाव एक गणपती या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या या उत्सवाचं यंदाचं ५८ वं वर्ष आहे. गावात १२० हून अधिक कुटुंबं राहतात. गणेशोत्सवादरम्यान ११ दिवस इथं भजन किर्तनाचे कार्यक्रम होतात. 


कशी सुचली संकल्पना?

नवी मुंबईचं कॉर्पोरेट हब म्हणून ओळख असणाऱ्या सीबीडी बेलापूरमधील पारसीक हिलच्या पायथ्याशी आग्रोळी गाव वसलं अाहे. एकेकाळी या गावात घराघरात गणपती विराजमान व्हायचे. पण ठाणे-बेलापूर पट्ट्यात १९६१ साली प्लेगची साथ आली होती. या पट्ट्यात भातशेतीशिवाय दुसरं कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही. अशातच हा आजार अाल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे घरात गणरायाची स्थापना कशी करायची? हा प्रश्न गावातील प्रत्येक कुटुंबाला पडला होता. तेव्हा गावात एकच गणपती बसवायचा हा निर्णय घेण्यात अाला.


‘यांनी’ केली सुरुवात

 १९६१ साली अचानक डोकं वर काढलेल्या प्लेगच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचाराबरोबर लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं होतं. यासाठी गावातीलच कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांसमोर एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली. सुरुवातीला ग्रामस्थांमध्ये या संकल्पनेबद्दल शंका होती. घरामध्ये गणपतीची स्थापना न केल्यास देव कोपेल अशी भिती ग्रामस्थांना होती. यावरही उपाय म्हणून कॉम्रेड पाटील यांनी स्वत:च्या घरातील मूर्तीपूजन बंद करून गावातील मंदिरात पूजन करत पुढाकार घेतला. अखेर कॉम्रेड पाटील यांची भूमिका ग्रामस्थांना पटली. तेव्हापासून आजतागायत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते.


सर्वधर्म समभाव

आग्रोळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ही परंपरा राबवली जात आहे. आजही गावकरी एकत्र येत गणपतीच्या स्वागताची तयारी करतात. घराघरातून ५००-७०० रुपये इतकी वर्गणी जमा केली जाते. यातून गणेशोत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात जल्लोषात सांस्कृतीक कार्यक्रम राबवले जातात. सर्व जाती समुदयाचे लोकं या उत्सवात आनंदानं सहभागी होतात.



एक आदर्श गाव

एका वेगळ्या ध्येयामुळे सुरू झालेली ही संकल्पना आज वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. एकप्रकारे स्वच्छ भारत मिशनला ते पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आग्रोळी गावचा आदर्श इतरांनी देखील घेणं आवश्यक आहे.



हेही वाचा

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा