गिरणगाव - लोअर परळची माऊली म्हणून प्रसिद्ध असलेले जय भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यंदा ५६ वे वर्षे साजरे करत आहे. लोअर परळ विभागात गिरण कामगार वर्ग आजही तोच जल्लोष आणि आकर्षक देखावे सादर करून हा उत्सव साजरा करतात. काळाच्या ओघात प्रथा, परंपरांचे स्वरूप बदललेले असले, तरी जय भवानी मंडळाने जुन्या परंपरा आजवर जपल्या आहेत. आलिशान देखाव्यात दिमाखदार बैठक असणारी देवीची ५ फुटी मूर्ती मनाला भुरळ घालते. या मंडळात अनेक जनहितार्थ कार्यक्रम राबवले जातात. समाज प्रबोधन, लोककला आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत असे अनेक कार्यक्रम राबवले जातात. स्त्री सुरक्षित प्रबोधन असे खास महिलांसाठी कार्यक्रमही मंडळाकडून राबवले जातात.