रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे महिलांनी बाजारात राखीच्या खरेदीला सुरुवात केली आहे. शिवाय शिक्षण आणि काही कामानिमित्त परदेशात किंवा लांब राहणाऱ्या आपल्या भावाला वेळेवर राखी मिळावी म्हणून बहिणींनी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी केली आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी बहीण आपल्या भावाची घरी येण्याची वाट पाहत असते. मात्र, कामानिमित्त परदेशात किंवा लांब राहणारा भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी घरी येणार नसल्यामुळं बहिणी भावला पोस्टाद्वारे राखी पाठवतात. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खास पिवळ्या रंगाचं आणि गुलाबी रंगाचं स्पेशल राखी पोस्टकार्ड उपलब्ध आहे. हे पोस्टकार्ड दहा रुपयाला पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
यंदा १० ऑगस्टपासून पोस्टाद्वारे राखी पाठवण्यासाठी सुरुवात झाली आहे. दिवसाला ७५० ते ८०० राख्या 'स्पिड पोस्ट' आणि 'रजिस्टर'द्वारे पाठवल्या जात असून मागील १० दिवसांत ५ हजार २५० राख्या पाठवल्या आहेत, अशी माहिती जनरल पोस्ट ऑफिसचे सुपरवायझर सुर्यकांत काजरोळकर यांनी दिली.