गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत प्रत्येक मंडळापासून ते घराघरांत सकाळ-संध्याकाळ बाप्पासाठी आरती म्हटली जाते. पण जर आरती पाठ नाही म्हणून टेन्शनमध्ये असाल तर डोन्ट वरी! कारण आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरत्या आपल्याला मोबाईलवर ऐकता येणार आहेत.
गणपती बाप्पाच्या आरतीसाठी अनेक नवीन अॅप सुरू झाले आहेत. अगदी 'सुखकर्ता दुखहर्ता' पासून 'घालीन लोटांगण'पर्यंत एका क्लिकवर या आरत्या ऐकता येणार आहेत.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल, तर आता तुम्हाला आरत्या पाठ करण्याची काहीच आवश्यकता नाही. प्ले स्टोअरवर जाऊन 'गणेश आरती' टाईप केले की अनेक अॅपचे ऑप्शन तुमच्यासमोर येतील. त्यात मराठी, हिंदी आशा भाषांचाही समावेश आहे. तुम्हाला हव्या त्या भाषेत हे अॅप डाउनलोड करता येईल.
घरी गणपती आल्यावर जर पूजा सांगायला गुरुजी मिळत नसतील, तर काळजी करायची काहीच आवश्यकता नाही. कारण या अँड्रॉइडच्या काळात तुम्ही गणपतीची पूजा गुरुजींशिवायच करू शकता. त्यासाठी तुम्हाला 'गणपतीची पूजा' हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर अगदी साग्रसंगीत पूजा घरच्या घरी करता येईल.
या अॅपमध्ये गणपतीची पूजा का करायची? कशी करायची? प्राणप्रतिष्ठा, उत्तरपूजा, गणपतीच्या पूजेला लागणारे साहित्य या सगळ्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला कळू शकते. त्यामुळे या वर्षीचा तुमचा बाप्पा इतरांपेक्षा स्मार्ट असणार, यात शंकाच नाही!
हेही वाचा -
मुंबईच्या बाप्पांची जम्मू-काश्मीर वारी!
मुंबईचा राजा यंदा सुवर्ण मंदिरात विराजमान होणार