मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. बेड कमी पडू नयेत म्हणून मुंबई महापालिकेनं हॉटेल्समध्येही क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. तर दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, आता काही तासांतच पालिकेने जसलोक रुग्णालय संपूर्णत: कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
जसलोक रुग्णालय कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याच्या निर्णयामुळे येथे अन्य रुग्णांना दाखल केलं जाणार नव्हतं. तसंच येथील कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांत हलविण्यात येणार होतं. मात्र, जसलोक हॉस्पिटलनं बीएमसीकडे २५० बेड ताब्यात घेण्याविषयी पुर्नविचार करण्याबाबत विनंती केली. जसलोक रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांसाठी ५८ बेड आहेत. कोरोना रुग्णांसाठी १५० बेड ठेवण्याची तयारी जसलोक रुग्णालयाच्या प्रशासनाने दर्शविल्यानंतर महापालिकेनं जसलोक पूर्णतः कोविड रुग्णालय करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
जसलोक हॉस्पिटलमध्ये ३० कॅन्सर पेशंट आहेत. तर काही पेशंट अनेक वर्षांपासून उपचार घेत असल्याचं हॉस्पिटलने म्हटलं आहे. हॉस्पिटलच्या विनंतीनंतर मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा जसलोक हॉस्पिटलमधील बेड असेसमेंट केले जातील. त्यानंतर नॉन कोविड पेशंटला इतरत्र हलवणे शक्य आहे का? हे तपासले जाईल आणि नंतर बेड ताब्यात घेतले जातील. जसलोक हॉस्पिटलमधील बेड असेसमेंटनंतर कोविड पेशंटसाठी १३५ ते १४० पर्यंत बेड ताब्यात घेतले जाऊ शकतात, असं पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा