मुंबईतील सुमारे ३० विद्यार्थी सिंगापूर एअरपोर्टला (singapore airport) अडकून पडले असून या विद्यार्थ्यांनी आपल्याला लवकरात लवकर भारतात घेऊन जाण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. कोरोनाच्या (Coronavirus,) पार्श्वभूमीवर सध्या जगभरातील विमानसेवा खंडीत करण्यात आल्याने हे विद्यार्थी अडकले आहेत. कोरोनाचा विळखा वाढत असताना या विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मलेशिया, फिलिपाईन्स, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशातून सुमारे ३० ते ३२ विद्यार्थी (mumbai students) भारतात येण्यास निघाले होते. मंगळवारी दुपारी मनीला येथून क्वाॅलालाम्पूरमार्गे मुंबईत येण्यास निघालेल्या या विद्यार्थ्यांना मलेशियन एअरलाइन्सने बुधवारी सकाळी सिंगापूर एअरपोर्टवर आणून सोडलं. त्याच वेळी या विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या मुंबईकडे येणाऱ्या विमानाचं तिकीट देण्यात आलं. तुमच्या पुढच्या प्रवासाची जबाबदारी एअर इंडियावर राहील, असं या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं.
परंतु दुपारी सिंगापूरहून एयर इंडियाच्या (air india) विमानाचे बोर्डिंग पास वाटत असताना या विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास नाकारण्यात आले. मलेशियातून येणाऱ्या प्रवाशांना भारतात प्रवेश न देण्यास मनाई असल्याचं सांगून या विद्यार्थ्यांना भारतात नेण्यास एअर इंडिया तसंच तसंच सिंगापूर एअर लाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे हे विद्यार्थी मागील काही तासांपासून सिंगापूर एअरपोर्टला अडकून पडले आहेत.
सतत दोन दिवस प्रवास करत असल्याने थकवा जाणवत आहे. जवळचे सगळे पैसे संपत आले आहेत. अन्नपाण्यावाचून हात होत आहेत. शिवाय अंगावर जुनेच कपडे असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या व्हायरसची लागण होण्याचा धोका वाढल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
काहीही करा परंतु आम्हाला इथून मायदेशी घेऊन जा, वाटल्यास मुंबईत परतल्यावर कुठेही विलगीकरण करून ठेवा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी व्हिडिओद्वारे भारत सरकारला केली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल.
सामंत यांनी तन्वी बोडस या विद्यार्थिनीशी दूरध्वनीवर संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास दिला.