कोरोनामुळे अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनमुळं अनेक जणांना मानसिक तणावाच्या त्रासाला सामोरं जावं लागलं. शिवाय, आजाराबाबतची भीती, आर्थिक अडचणी अशा विविध बाबींमुळे ६० टक्के मुंबईकरांना मानसिक ताणतणाव, नैराश्याला तोंड द्यावे लागल्याचे ‘प्रजा फाउंडेशन’च्या अहवालातून निदर्शनास आले आहे. मात्र यातील ८४ टक्के नागरिकांनी यातून बाहेर पडण्यासाठी कोणीतीही मदत न घेतल्याचे वास्तवही या अहवालातून समोर आले आहे.
लॉकडाऊनमधील आरोग्य समस्या जाणून घेण्यासाठी प्रजाने मुंबईतील ७६९ नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. लॉकडाऊनच्या काळात अचानकपणे घडलेल्या काही गोष्टी, दैनंदिन आयुष्यात आलेली अनेक बंधने, आजाराचे भय अशा अनेक स्तरांवर झगडताना चिंता, ताण वाढल्याचे अनुभव ६० टक्के मुंबईकरांनी व्यक्त केले. परंतु यातील ८४ टक्के जणांनी यातून बाहेर पडण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही, असेही मत मांडले आहे. मानसिक ताणतणावाचा त्रास झालेल्या केवळ ४ टक्के नागरिकांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली.
यात ९० टक्के सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उच्च स्तरातील होते, तर दुर्बल स्तरातील केवळ १ टक्के नागरिकांचा समावेश होता. यातील ८३ टक्के नागरिकांनी हे गंभीर नसल्याचे नमूद करत मदत घेतली नाही. तर ७ टक्के नागरिकांना तणावातून बाहेर पडण्यासाठी मदत घेणे गैरसोयीचे वाटते, तर ५ टक्के नागरिकांना अविश्वाासार्ह वाटत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
लॉकडाऊनमुळं आर्थिक फटका तर बसलाच, मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या. अलगीकरणामुळे आलेला शारीरिक व मानसिक ताण आणि काम सुटणे, पगार न मिळणे, स्व-विलगीकरण इत्यादींमुळे मानसिक स्वास्थ्य खालावल्याचे दिसून येते. या परिस्थितीमुळे मानसिक आरोग्याचा मुद्दा समोर ठाकला. मानसिक आरोग्याविषयी अधिक जाणीवजागृतीची आणि सुधारणेची गरज असल्याचे लक्षात येते.
कोरोनाचे उपचार घेण्यासाठी पालिकेची सार्वजनिक आरोग्य रुग्णालयांना प्राधान्य दिल्याचे ७३ टक्के मुंबईकरांनी व्यक्त केले. सर्वेक्षणातील २ टक्के करोनाबाधित होते. यातील ३९ टक्के रुग्णांनी मोफत उपचार घेतले. ६१ जणांनी उपचारासाठी खर्च केला असला तरी यातील ५० टक्के रुग्णांना १० हजारांहून कमी आर्थिक भार झेलावा लागला. पालिका रुग्णालयात उपचार घेतलेल्यांपैकी जवळपास २७ टक्के रुग्णांनी सेवा चांगल्या दर्जाची असल्याचे मत मांडले आहे.