Advertisement

लहान मुलं अडकली सिगारेटच्या विळख्यात


लहान मुलं अडकली सिगारेटच्या विळख्यात
SHARES

मै जिंदगी का साथ निभाता चला गया... हर फिक्र को धुऐ में उडाता चला गया... अशीच काहीशी गत हल्लीच्या पिढीची झाली आहे. युवा पिढी आपलं अर्ध आयुष्य सिगारेटच्या धुरात वाया घालत असल्याचं वास्तव समोर आलं आहे!

भायखळ्याच्या प्रिन्स अली खान या रुग्णालयाने महापालिकेच्या 30 शाळांतील मुलांचं सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणात उघड झालेली माहिती वाचून तुम्हाला धक्का बसेल. तब्बल 27 टक्के मुलं-मुली धुम्रपान करत असल्याचं त्यांनी दिलेल्या अहवालात समोर आलं आहे. शिवाय, ही सर्व मुलं वी ते वी इयत्तेतील आहेत.

हे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे. त्यामुळे हा अहवाल अजून प्राथमिक स्तरावर असून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता असल्याचंही रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.

प्रिन्स अली खान रुग्णालयाने दिलेली आकडेवारी खरंतर धक्कादायक आहे. पण, हे तेवढंच वास्तव आहे की बदलत्या जीवनशैलीमुळे, पालक आणि मुलांमध्ये कमी प्रमाणात असलेल्या संवादामुळे मुलांना अशा सवयी आपोआपच जडतात.

प्रिन्स अली खान रुग्णालयाने सर्वेक्षणानंतर जी मुलं सिगारेटच्या विळख्यात सापडली आहेत, त्यांना त्यापासून कसं परावृत्त करता येईल? यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वेगवेगळे जनजागृतीपर कार्यक्रम या रुग्णालयातर्फे घेतले जाणार आहे. डिसेंबरमध्ये त्या महापालिका शाळांमध्ये जाऊन व्यसन जडलेल्या मुलांच्या विकासासाठी एक मोहीम घेण्यात येणार आहे.

भारत कर्करोगमुक्त व्हावा, यासाठी खरंतर अनेक मोहिमा राबवल्या जातात. पण, तरीही मुलांना सिगारेट कशी काय उपलब्ध होते ? हाच खरा प्रश्न आहे. या आणि अशा अनेक विषयांवर ‘मुंबई लाइव्ह’ने प्रिन्स अली खान रुग्णालयातील कम्युनिटी हेल्थ सर्विस अॅण्ड रिसर्च विभागाचे प्रमुख आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्रांती रायमाने’ यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.





शाळा परिसरात असणारा नियम

शाळेच्या 50 ते 100 मीटर परिसरात कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसला पाहिजे. जर असेल, तर त्यावर आरोग्य विभागाकडून कारवाई केली जाते.

कमी वयातच सिगारेटचं व्यसन लागलं तर काय परिणाम होऊ शकतो ?

लहान वयात जी मुलं व्यसनाच्या आहारी जातात, त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शारिरीक या सर्वच जीवनपद्धतींवर परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या शारीरिक स्वास्थावर त्याचा परिणाम होतो. मित्रांच्या संगतीने धुम्रपान करण्याचं व्यसन जडतं. ते व्यसन कायम राहिलं तर कमी वयात कर्करोग होऊ शकतो.


पालकांची जबाबदारी काय?

आपला पाल्य शाळेतून घरी आला, की त्याच्याशी किमान अर्धा तास बसून शांतपणे चर्चा करावी. शिवाय, जबाबदारीची जाणीव ठेवत व्यसन या विषयावर चर्चा केली पाहिजे. काय चूक काय बरोबर? यावर संवाद साधला पाहिजे. म्हणजे मुलांच्या विचार प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. तसंच त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? याविषयी माहिती घेतली पाहिजे.


व्यसनातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे ?

मुलांना लहानपणापासूनच माहिती असते पण, त्याची मुळातच वृत्ती ही बदलण्याची असली पाहिजे. त्यासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती ते कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, अशी वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे त्यांच्यासमोर जरी दारु किंवा सिगारेट असेल, तरी त्यांचं मन त्यापासून परावृत्त होईल.

जर मुलांना व्यसनापासून परावृत्त करायचं असेल, तर सर्वांनीच आपली जबाबदारी समजली पाहिजे. जेणेकरुन, लहान मुलं धुम्रपान करण्याचं प्रमाण 10 टक्के तरी कमी होईल, असा विश्वास डॉ. रायमाने यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केला आहे.

यासाठी प्रिन्स अली खान हे रुग्णालय देखील प्रयत्नशील आहे. मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी डिसेंबरपासून एक विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे. ज्यात मुलांना एका विषयावर निबंध लिहायला दिला जाईल. तसेच, पालक आणि मुलांचा संवाद, पोस्टर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून या माध्यमातून त्यांना तंबाखूसेवनाच्या दुष्परिणामांची माहिती करून दिली जाणार आहे.

शिवाय, रुग्णालयाच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊन समाजसेवक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, याबाबत जनजागृती करणार आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा