नवी मुंबई महानगरपालिकेला (NMMC) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामार्फत 'पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देणे महापालिकेला शक्य होणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य सेवा सक्षम होणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.
राज्य शासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर ठाणे लोकसभा सदस्य नरेश म्हस्के यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व केंद्रीय आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा केला.
याचा परिणाम म्हणून नवी मुंबईत पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्था सुरू करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाची परवानगी मिळाली आहे. या मान्यतेनुसार पहिल्या टप्प्यात 'मेडिसिन (3 जागा), 'ऑर्थोपेडिक्स (2 जागा), 'स्त्रीरोग (8 जागा) आणि 'बालरोग (4 जागा)' अशा 4 शाखा सुरू करण्यात येत आहेत. लवकरच शस्त्रक्रिया शाखेलाही परवानगी मिळणार आहे.
मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वाशी आणि नेरूळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू होणार आहे. या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयात (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षणासाठी येणार असून या प्रशिक्षित डॉक्टरांचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अतिदक्षता, बालरोग अतिदक्षता, आपत्कालीन आणि ट्रॉमा सेवा यासारख्या सुपर स्पेशालिटी सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे. यातून महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम होऊन नवी मुंबईतील नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा