वांद्र्यातील भाभा रुग्णालयात बुधवारी सकाळी कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोरोनाच्या भीतीनं रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना क्वारंटाइन करण्याची मागणी केली. रुग्णालयाबाहेर येऊन त्यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या १५ कर्मचाऱ्यांचं वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला आहे.
भाभा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं मुख्य वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेत सर्वांना क्वारंटाइन करण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन करण्याची मागणी करत याकरिता तासभरात रुग्णालयाच्या आवारात जमले होते. अखेर प्रशासनानकडं मागणी लावून धरल्यानंतर या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्याऐवजी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचं नमुने घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आलं.
हेही वाचा -
Coronavirus Updates: मुंबईतील परिचारिका वसतीगृह बंद
जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट