रिलायन्स इंडस्ट्रीज (reliance Industries Limited ) आपल्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचा कुटुंबियांचं मोफत लसीकरण करणार आहे. रिलायन्सने याबाबत घोषणा केली आहे. रिलायन्सचे ८८० शहरात असलेले १३ लाखांहून अधिक कर्मचारी, सहयोगी, पार्टनर्स आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा, सासू-सासरे, मुलं, भावंडं आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रिलायन्समधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लस देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरणासाठी को-विन प्लॅटफॉर्मवर (Co-WIN Platform) नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ते जिओ हेल्थक्लब (Jio Healthclub) या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना सोयीच्या असलेल्या ठिकाणी लसीकरणाचा स्लॉट बुक करू शकतात.
सरकारने वर्कप्लेस व्हॅक्सिनेशन पॉलिसी जाहीर केली आहे. त्या अंतर्गत रिलायन्स हा उपक्रम राबवणार आहे. जामनगर, बडोदा, हझिरा, दहेज, पाताळगंगा, नागोठणे, कनिकाडा, गडिमोगा, साहडोल, बाराबंकी, होशियारपूर येथे असलेल्या रिलायन्सच्या ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर्समध्ये लसीकरण केलं जाणार आहे. त्याशिवाय 800 हून अधिक शहरांमध्ये असलेली रिलायन्सची हॉस्पिटल्स, तसंच अपोलो, मॅक्स, मणिपाल अशा पार्टनर हॉस्पिटल्समध्येही हे लसीकरण केलं जाणार आहे. जे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आधीच लस घेतली असेल. त्यांना त्यासाठी आलेल्या खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. कंपनीच्या साडेतीन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी याआधीच लशीचा पहिला डोस घेतला आहे.
रिलायन्सने १५ जूनपर्यंत सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लसीचा पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या ग्रुप कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांसह स्टोअर लेव्हल स्टाफ अशा १३ हजार रिटेल आणि जिओ स्टोअर्समधल्या कर्मचाऱ्यांचंही लसीकरण या उपक्रमांतर्गत केलं जाणार आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खासगी कंपन्यांना/संस्थांना लस विकत घेण्याची परवानगी सरकारकडून मिळाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन्ही लशींच्या डोसेसची खरेदी केली आहे.
हेही वाचा -