मेट्रोच्या कामांमुळे माहीमच्या लक्ष्मी निवासमधील इमारतीतील १२ कुटुबांना घर सोडण्याची वेळ आली. रविवारी इमारतीचा पाया खचल्यानं ही परिस्थिती उद्भवली. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने ही इमारत रिकामी केली असून रहिवाशांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
माहीम परिसरात एल. जे. रस्त्यावर लक्ष्मी निवास ही निवासी इमारत आहे. या रस्त्यावर कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी असलेल्या ‘मेट्रो ३’च्या शीतलादेवी स्थानकाचं काम सुरू आहे. मेट्रोच्या कामादरम्यान इमारतीच्या ढाच्याला तडे गेले. कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला आणि त्यामुळे इमारतीच्या ढाच्याला तडे गेले, असं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शनिवारी रात्रीच्या सुमारास इमारतीला तडे गेले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. रहिवाशांनी शनिवारची रात्र इमारतीतच काढली. रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा इमारतीला तडे गेल्याची तक्रार रहिवाशांकडून आल्यानं मेट्रो-३चे काम करणाऱ्या ‘एमएमआरसीएल’नं इमारतीची पाहणी केली. इमारतीला हानी झाल्याची खात्री पटल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांना ‘एमएमआरसीएल’नं इमारत खाली करण्यास सांगितलं. ‘एमएमआरसीएल’ने एका हॉटेलमध्ये या रहिवाशांची तात्पुरती राहण्याची सोय केली आहे. काही रहिवाशांनी या हॉटेलमध्ये आसरा घेतला आहे. तर काहींनी नातेवाईकांच्या घरी राहणं पसंत केलं आहे.
हेही वाचा