घोटाळ्याचे घर बनलेल्या म्हाडाचा आता आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. तो म्हणजे बोगस बांधकाम साहित्य दर्जा प्रमाणपत्र घोटाळा. म्हाडाची शौचालये असो, व्यायामशाळा वा संरक्षण भिंती, या सर्वांची अल्पावधीतच दुरवस्था का होते?दुरूस्त झालेल्या उपकरप्राप्त इमारती लागलीच धोकादायक कशा होतात? इतकेच काय म्हाडाच्या घरांचा ताबा घेतल्यानंतर काही दिवसांत भिंतीला तडे, गळती, स्लॅबचा भाग कोसळणे, फरशा उखडणे अशा समस्या का निर्माण होतात?याचे उत्तर बोगस बांधकाम साहित्य दर्जा प्रमाणपत्र घोटाळ्यात दडले आहे.
म्हाडाच्या दक्षता आणि गुणनियंत्रक कक्षाकडून बांधकाम साहित्याचा दर्जा तपासल्याशिवाय कंत्राटदाराला ते साहित्य बांधकामासाठी वापरता येत नाही. असे असताना झोपडपट्ट्यांमधील नागरी सुविधांची कामे करताना बांधकाम साहित्याचा दर्जा न तपासताच कंत्राटदारांना बोगस दर्जा प्रमाणपत्र म्हाडा अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची बाब २०१२-१३ मध्ये लोकलेखा समितीच्या निदर्शनास आली.
त्यानुसार लोकलेखा समितीने या प्रकरणाची तपासणी करत, सुनावणी घेत अखेर हा बोगस बांधकाम साहित्य दर्जा प्रमाणपत्राचा घोटाळा असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यातून म्हाडा अधिकारी निकृष्ट दर्जाच्या बांधकामातून लोकांच्या जीवाशी कसे खेळतात? हेही समोर आले आहे.
ज्या अधिकाऱ्यांनी ही बोगस प्रमाणपत्रे दिली, जे अधिकारी या प्रकरणात सहभागी होते त्यांचे निलंबन करावे, असे आदेश लोकलेखा समितीने सुनावणीत दिले आहेत. मात्र म्हाडाने या अधिकाऱ्यांचे त्वरीत निलंबन करण्याएेवजी ५५ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या आहेत.
त्यामुळे याप्रकरणी म्हाडा वेळकाढूपणा करत अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय का? निलंबनाची कारवाई करण्यास टाळाटाळ करतेय का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. तर दुसऱ्या बाजूला कारणे दाखवा नोटीशीमुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे म्हाडातील सूत्रांकडून समजत आहे.
झोपडपट्टी सुधार मंडळातील कामातून हा घोटाळा समोर आला आहे. मात्र म्हाडातील सर्वच प्रकारच्या कामात साहित्याची तपासणी न करता बोगस प्रमाणपत्र दिले जात असून त्यासाठी दामदुप्पट वसुली केली जाते. या प्रकरणातील ३७ दोषी कंत्राटदारांना म्हाडाने काळ्यायादीत टाकले आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांविरोधातही कडक कारवाईची मागणी होत आहे.
याविषयी म्हाडाच्या मुख्य अभियंत्या मेधा शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तर, म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हेही वाचा -
म्हाडाला हवाय नियोजन प्राधिकरणाचा दर्जा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)