मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 31 मे 2015 मधील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. मात्र त्याचवेळी याच सो़डतीतील मुलुंडमधील 367 विजेत्यांना मात्र घरासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. या घरांना पालिकेकडून ओसीच मिळत नसल्याने पात्र विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे विजेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
2015 च्या सोडतीतील मुलुंड, गव्हाणपाडा येथील अल्पगटातील 182 आणि मध्यमगटातील 185 अशी 367 घरे वर्षभरापूर्वी बांधून तयार झाली आहेत. तर 367 विजेत्यांपैकी 330 विजेत्यांची पात्रताही सिद्ध झाली आहे. आता विजेत्यांनी पैसे भरले कि त्यांचा नव्या घरात प्रवेश होणार आहे. पण या घरांना ओसी नसल्याने घरांचा ताबा देता येत नाहीये. ओसी कधी मिळणार याची विचारणा विजेत्यांकडून सातत्याने होत आहे पण त्यांना म्हाडाकडून ठोस अाश्वासन मिळत नसल्याची माहिती एका विजेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तर याबाबत मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी ताबा रखडल्याचे मान्य केले. पण त्याचवेळी ओसीसाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच ओसी मिळेल, असे स्पष्ट केले आहे. पण लवकरच म्हणजे नेमके कधी याचे उत्तर या अधिकाऱ्याकडेही नसल्याने या विजेत्यांनी किती काळ प्रतिक्षा करावी लागणार हा प्रश्नच आहे.