गणेशोत्सव, रंगपंचमी आणि दिवाळी या उत्सवांमध्ये एक कॉमन ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून रुजतोय तो म्हणजे इको फ्रेंडली. आता यामध्ये रक्षाबंधन सणाचाही समावेश झाला आहे. बदलत्या काळानुसार या सणालाही आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध प्रकारच्या, आकाराच्या राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, यात पर्यावरणपूरक अशा 'सीड राखी' भाव खाऊन जात आहेत.
भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतिक असलेला हाच धागा निसर्गरक्षणाचंही प्रतिक बनणार आहे. रक्षाबंधन झाल्यानंतर अनेकदा राखी कुठं तरी आपण ठेवून देतो किंवा त्यांचं विसर्जन करतो. पण यावर एक अफलातून पर्याय आता उपलब्ध झाला आहे. रक्षाबंधन झाल्यानंतर तुम्ही राखी कुंडीतल्या मातीमध्ये ठेवू शकता. त्यातून रोप उगवतं. एकप्रकारे सीड राखी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं फार फायदेशीर आहे.
रक्षाबंधनानिमित्त बाजारात असलेल्या बऱ्याचशा राख्या या बिटी कापूसपासून बनवलेल्या असतात. त्याचं विघटन होत नाही. याशिवाय त्यात रासायनिक कलर देखील असतात. यावर मात करण्यासाठी अनेक ग्रुप्सनी सीड राखी संकल्पना बाजारात आणली आहे. 'द ग्राम आर्ट प्रोजेक्ट' तर्फे अनेक गावं यात सहभागी आहेत. राखी बनवण्यासाठी कुठल्याच आर्टिफिशियल वस्तूंचा वापर केला जात नाही. यासाठी तांदूळ, ज्वारी, राजगिरा, चंदन, तुळस, परिजात, नाचणी यांसारख्या बियांचा वापर केला जातो.
इको फ्रेंडली राखी बनवण्यासाठी देशी कापूस आणि नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. या राख्यांमध्ये झाडाच्या बिया वापरल्या जातात. या राख्यांसाठी लागणारा कापूस हा मध्यप्रदेशात उगवणारा आहे. मध्यप्रदेशमधून हा कापूस महाराष्ट्रातल्या वर्धामध्ये येतो. वर्धामध्ये त्यात धागा बनवला जातो. हा धागा वर्ध्यामधून अनेक ठिकाणी पाठवला जातो. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या ग्रामीण भागात तसंच अनेक संघटनांना हा धागा पुरवला जातो. या धाग्याचा वापर करून विविध रंगाच्या आणि बियांच्या राख्या बनवल्या जातात.
हेही वाचा