मलबार हिलमधील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनचं सौंदर्य मुंबईकर असो वा देशाबाहेरील पर्यटक सर्वांनाच खुणावतं. त्यामुळे मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक आवर्जून राजभवनला भेट देत या ऐतिहासिक वास्तूचं सौंदर्य न्याहाळतो. राजभवनची इमारत असो वा इथलं गार्डन किंवा दस्तावेज पर्यटकांसाठी सर्वकाही लक्षवेधी ठरतं. त्यात मंगळवारी बॅटरीवर चालणाऱ्या देखण्या बसची भर पडली असून या इलेक्ट्रीक बसमधून राजभवनची सफर करता येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा (एमटीडीसी) तर्फे राजभवनला फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांसाठी ही बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक बस देण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या बसचं उद्घाटन करण्यात आलं. राजभवनचा परिसर फार मोठा असून राजभवनचं सौंदर्य न्याहाळायला किमान २ तास तरी लागतात. अशावेळी उन, वारा, पावसात पर्यटकांची मोठी गैरसोय होते. हीच बाब लक्षात घेत 'एमटीडीसी'ने ही खास बस राजभवनला सुपूर्द केली आहे. ही बस पर्यटकांचा प्रवास सुकर करण्यासोबतच राजभवनाच्या सौंदर्यातही भर टाकणार आहे.
साधारणत: १२ ते १५ प्रवासी क्षमता असलेली ही बस अतिशय आरामदायी असून बसमधील कुठल्याही सीटवर बसून राजभवनचं सौंदर्य न्याहळणं पर्यटकांना सहज शक्य होणार आहे. ही बस बॅटरीवर चालणारी असल्याने इंधन तर वाचणार आहेच; पण सोबतच प्रदूषणापासूनही राजभवनाचा बचाव करता येईल हे विशेष. राजभवनची इमारत आणि परिसर हेरिटेजमध्ये मोडत असल्याने या परिसरात अशाच खास बसची गरज होती. या गाडीची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी राजभवन प्रशासनाची असणार आहे.
हेही वाचा-
मुंबईतल्या 'या' आलिशान चित्रपटगृहाला एकदा भेट द्याच!
जमनालाल बजाज पुरस्कार कुणाकुणाला जाहीर? वाचा