शिवसेनेच्या दबावापुढं झुकून अखेर भाजपाने किरीट सोमय्यांचं (Kirit Somaiya) तिकीट कापत पक्षाचे मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून (mumbai north east) उमेदवारी दिलीय. तर सोमय्यांनाही नाराज न करता राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलंय. या आश्वासनाची पूर्तता नेमकी केव्हा होईल? होईल की नाही हे येणारा काळंच ठरवेल. तूर्तास पक्षश्रेष्ठींच्या या भूमिकेवर सोमय्यांना थेट प्रतिक्रिया देता येत नसली, तरी आतून ‘जो बूँद से गयी, सो हौद से नही आती।’ या हिंदीतील अत्यंत लोकप्रिय म्हणीचा अनुभव त्यांना नक्कीच येत असावा.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती पक्की झाल्यावर युती धर्माचं पालन करण्याचे आदेश दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले. कार्यकर्तेही मनातली तेढ बाजूला सारून युतीचा झेंडा हाती घेऊन कामाला लागले. परंतु राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी १ जागा अशी होती जिथं युती धर्माचं पालन होईल की नाही याबाबत केवळ कार्यकर्तेच नाही, तर पक्षश्रेष्ठीही साशंक होते. ही जागा होती ईशान्य मुंबईची. जिथून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं. परंतु शिवसेनेने सोमय्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याने सोमय्यांना या जागेवर पाणी सोडावं लागलंय.
देशभरात लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालीय. काल परवा जाहीर व्यासपीठावरून एकमेकांचे कपडे उतरवण्याची भाषा करणारी नेतेमंडळी आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मिरवू लागलीय. मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगताना सहकारी पक्षाला अफजल खानाची उपमा देणारे पक्षश्रेष्ठीही त्याच फौजेत सामील होऊन परस्पराच्या दाढ्या कुरवाळू लागलेत. तर युतीधर्माचं पालन करण्यासाठी अर्जुनालाही मान खाली घालून आपल्या हातातील धनुष्यबाण भात्यात ठेवावा लागलाय. अशी सगळी जुळवाजुळव सुरू असताना सोमय्यांचं नेमकं चुकलं कुठं? सेटींगबाजांचे पत्ते खोलणाऱ्या सोमय्यांना स्वत:चं तिकीट सेट का करता आलं नाही? हा प्रश्न त्यांनाच नाही, तर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पुढचे काही दिवस तरी नक्कीच सतावणार आहे.
राजकारणात नेहमी हातचे पत्ते राखून डाव खेळावा लागतो. परंतु सगळेच पत्ते उघड करून ‘शो’बाजी करण्याची चूक किरीट सोमय्यांच्या अंगलट आली. सोमय्या २०१४ मधील मोदी लाटेत ३ लाखांहून जास्त मताधिक्याने निवडून आले होते. तरीही ग्रासरूटला कार्यरत असणारे किरीट कामांपेक्षा जास्त चर्चेत राहिले ते आपल्या ‘वाचाळवीर’ या प्रतिमेमुळे. अनंत वाचाळ बरळती बरळ! ही ओळख किरीट सोमय्यांना इतकी परफेक्ट चिकटली की विरोधी पक्षच नाही, तर स्वत:च्या पक्षातल्या नेत्यांनाही त्यांची सलगी नकोशी झाली.
सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली इतरांवर चिखलफेक करणाऱ्या बोलघेवड्या नेत्यांची संख्या प्रचंड वाढलीय. त्यात सत्ताधारी अन् विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांची भरमार आहे. एकदा का सत्तेचं घोडं गंगेत न्हालं की हातात माईक घेऊन बेलगाम वक्तव्य करायला ही नेतेमंडळी मोकळी होतात. पक्षही अनेकदा अशा वाचाळवीरांना आवरण्याऐवजी त्यांचं समर्थन करतो. मग काय उचलली जीभ लावली टाळूला अशा पद्धतीने वक्तव्य करणारी ही मंडळी एका टोकाला जाऊन इतकी बेताल होतात की त्यांना कंट्रोल करणं खुद्द पक्षालाही जमत नाही. आपल्या वक्तव्याचा समाजमनावर काय परिणाम होतोय, त्यातून आपली काय प्रतिमा तयार होतेय, याचीही जाणीव त्यांना होत नाही. पुढं जाऊन हीच नकारात्मक प्रतिमा त्यांच्यावर उलटते. अशीच काहीशी गत सोमय्यांची झाली.
महापालिका निवडणुकीच्या वेळेस एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी सोडली नव्हती. परंतु सोमय्या यांनी तर हद्दच केली. त्यांनी थेट शिवसेनेच्या नेतृत्वालाच हात हातला. एसआरए प्रोजेक्ट घोटाळा, मनी लाँडरिंग प्रकरण बाहेर काढण्याची, मुंबई महापालिकेतील माफियाराजचा भांडाफोड करण्याची धमकी देण्यासोबतच त्यांनी ठाकरे कुटुंबियांना संपत्ती जाहीर करण्याचं खुलं आव्हान दिलं. उत्पन्नाच्या साधनांवर असंख्य प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या प्रकारामुळे भाजपाला महापालिका निवडणुकीत फायदा झाला असला, तरी शिवसेना आतून चांगलीच दुखावली. त्याचंच उट्ट नंतर शिवसेनेनं काढलं.
आधी वेगळी चूल मांडण्याची रणनिती खेळून भाजपाला पायघड्या घालायला लावल्या. तर ऐन मोक्याच्या क्षणी सोमय्यांना तिकीट दिल्यास शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करायला मागं पुढं पाहणार नाही, अशी वॅर्निंग दिली. शिवसैनिकांनीही सोमय्यांना उमेदवारी दिली, तर शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत तसंच एकही शिवसैनिक त्यांना मत देणार नाही, असं ठणकावलं.
शिवसेनेने याआधी पालघर आणि जालन्यातल्या जागेचं दान भाजपाच्या झोळीत टाकलेलं असल्याने शिवसेनेच्या दबावापुढं झुकून अखेर भाजपाला सोमय्यांचा पत्ता कट करावाच लागला. निवडणुकीच्या वेळेत भाजपाचं शिवसेनेशिवाय काहीही चालू शकत नाही, असा डबल मेसेजही युतीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात शिवसेना या खेळीनं यशस्वी झाली. यामुळे भविष्यात शिवसेना नेत्यांविरोधात तोंड खोलताना भाजपाच्या नेत्यांना दहादा विचार नक्कीच करावा लागेल.
असंही म्हटलं जातंय की भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व हाताबाहेर गेलेल्या सोमय्यांच्या वागण्यावर नाराज होते. आपल्या मतदारसंघातील स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणं, त्यांच्याशी सलोख्याचे संबंध न ठेवणं, त्यांना ऐन वेळी जड गेलं. कारण त्यांच्या तऱ्हेवाईकपणाची खडानखडा माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचली होती.
सोमय्या आडवाणी कंपूतील असल्याचा फटकाही त्यांना बसला. आपला मुलगा नील याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून त्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कार्यालयात केलेल्या थयथयाटामुळे दिल्लीतील नेतेही त्यांच्यावर खट्टू होते. त्यामुळेच शिवसेनेकडून त्यांच्या तिकीटावर आक्षेप घेतला जात असताना केंद्र वा राज्यातील एकही बडा नेता मध्यस्तीसाठी स्वत:हून पुढं आला नाही.
सोमय्या यांच्या जागेवर कॅबिनेटमंत्री प्रकाश मेहता, नगरसेवक प्रवीण छेडा यांच्यासोबत मनोज कोटक यांच्या नावांची चर्चा सुरू होती. त्यात कोटक यांनी बाजी मारली. मेहता अमित शहा यांच्या तर कोटक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. या सर्व घडामोडींमुळे कोटक यांना आयती लाॅटरी लागली असली, तरी कोटक युतीच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरतील का हा देखील प्रश्न आहे.
सध्या किरीट यांनी कोटक यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिलंय. झालं गेलं विसरून जात सोमय्यांनी याच पद्धतीने स्वत:ला व्यस्त ठेवल्यास झालेल्या अपमानाची सल त्यांना बोचणार नाही. इतकंच या निमित्ताने म्हणता येईल.
हेही वाचा-
जाहिरातबाजीत भाजपा अव्वल; काँग्रेस सहाव्या स्थानावर
भाजपाविरोधात राज ठाकरे घेणार ८ ते ९ सभा