Advertisement

राज आणि अखिलेश यांचे भाजपाविरोधात 'डिजिटल युद्ध'!


राज आणि अखिलेश यांचे भाजपाविरोधात 'डिजिटल युद्ध'!
SHARES

'डिजिटल पार्टी' भारतीय जनता पक्षाने डिजिटली म्हणजे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन निवडणुका लढवल्या. विरोधकांचं सर्व पातळ्यांवर चारित्र्यहनन करुन निवडणुका जिंकल्या आणि कोणत्याही भारतीयाला स्वप्नातही वाटलं नसेल असं 'ट्विटर सरकार' स्थापन केलं. सोशल मीडियाचा वापर करुन निवडणुका जिंकता येतात, हे भाजपनेच या देशात सर्वात पहिल्यांदा सिद्ध 'करून दाखवलं'! 

भाजपने राजकीयदृष्ट्या डिजिटल तंत्रज्ञानाचा 'अर्ली बर्ड्स अॅडव्हांटेज' मिळवला असला, तरी आता इतर पक्षीही, साॅरी राजकीय पक्ष डिजिटली कामाला लागले आहेत! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:चं फेसबुक पेज सुरु करणं आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 'समाजवादी डिजिटल फोर्स'ची स्थापना करणं या दोन घटना या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.



देशातल्या हिंदू-मुस्लिम राजकारणाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे सर्वात महत्वाचं आणि संवेदनशील राज्य आहे. भाजपच्या डिजिटल टीमकडून कायमच धार्मिक विद्वेषपूर्ण प्रचार सोशल मीडियावर केला जातो आणि त्याचा फटका समाजवादी पार्टीला बसला, असा सपा नेत्यांचा आजचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच, उत्तर प्रदेशातला आपला जनाधार पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी आणि ट्विटर, फेसबुक, व्हाॅट्स अॅप, यूट्यूब आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'समाजवादी डिजिटल फोर्स'ची स्थापना करण्यात आली आहे. या डिजिटल फोर्सची पहिली बैठक काल मंगळवारी उत्तर प्रदेशच्या राजधानीत म्हणजेच लखनौत झाली. या पहिल्या बैठकीला उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यातील सपाचे निवडक तरूण कार्यकर्ते उपस्थित होते. या डिजिटल फोर्सचं ब्रीदवाक्य आहे- 'हम हैं डिजिटल'!

भाजपची डिजिटल टीम किंवा ट्रोल अनेकदा बनावट अकाऊंट्सद्वारे सपाला (सर्वच विरोधी पक्षांना) बदनाम करत असते. अशा 'डिजिटल फेकूं'ना चाप लावण्यासाठी 'समाजवादी डिजिटल फोर्स' काम करणार आहे. गरज पडली तर 'करारा जवाब' देणार आहे. डिजिटल फोर्सचे सदस्य अशा 'डिजिटल फेकूं'वर आणि त्यांच्या 'बनावट' अकाऊंट्सवर लक्ष ठेवतील. त्यांच्यामुळे जातीय-धार्मिक तणाव निर्माण होत असेल, तर पोलिसांकडे तक्रार करतील. 

'समाजवादी डिजिटल फोर्स'ने कसं काम करायचं? ते करताना काय पथ्यं पाळायची? यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वही घालून देण्यात येणार आहेत. ही जबाबदारी अखिलेश यांनी हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी-साहित्यिक उदय प्रताप सिंह यांच्यावर सोपवली आहे.

समाजवादी पक्षाच्या धोरणांचा प्रचार करण्यासाठी आणि विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी या डिजिटल फोर्सची स्थापना केल्याचं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 'समाजवादी डिजिटल फोर्स'च्या सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. पण त्यासाठी इच्छुक असलेल्यांनी http://www.samajwadidigitalforce.com/  या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी अर्ज भरणं अपेक्षित आहे.

योगायोगाची गोष्ट अशी की, गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं अधिकृत Raj Thackeray फेसबुक पेज सुरु होण्याच्या काही दिवस आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लोकांना, विशेषत: पक्षातल्या तरुण सदस्यांना मनसे सोशल मीडिया सेलचं अधिकृत सदस्यत्व स्वीकारण्याचं आवाहन करणारी अशाच प्रकारच्या नोंदणी अर्जाची आॅनलाईन लिंक पाठवण्यात आली होती. 

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं, ते आता त्यांच्यावरच बुमरँग झालंय.

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेतल्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, 10 हजारांहून अधिक लोकांनी हा आॅनलाईन नोंदणी अर्ज भरुन मनसे सोशल मीडिया सेलचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. अखिलेश यांच्या 'समाजवादी डिजिटल फोर्स'प्रमाणेच ही 10 हजारांची 'मनसे डिजिटल सेना' सुद्धा लवकरच कामाला लागेल, अशी दाट शक्यता आहे.  

दोन महिन्यांपूर्वी तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकात्यातील एका विराट सभेत "तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपाकडून केल्या जाणा-या डिजिटल 'फेक' प्रचाराला बळी पडू नये, त्यावर बारीक नजर ठेवून काही जातीय-धार्मिक प्रचार होत असल्यास आमच्यापर्यंत तो विषय पोहोचवा", असं जाहीर आवाहन केलं होतं. तर दुसरीकडे, गुजरातमध्येही काॅंग्रेसची डिजिटल टीम जोराने कामाला लागली असून त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांना "सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका", असं मत व्यक्त करण्याची पाळी आली होती.

एकंदरच पुढचा काही काळ राजकीय डिजिटल लढाईच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


Disclaimer: The views and opinions expressed in this article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of Mumbai Live.


हेही वाचा

'मोदींचे मयत' दै.'सामना'त 'सरकारचे मयत' कसे झाले?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा