शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावरून शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनीही एकनाथ शिंदेंच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.
“गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला, तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं केदार दिघे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “हे ट्वीट करण्याअगोदर मीडियामध्ये त्यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा होती. भाजपाकडे जाऊन उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी त्यांची मागणी होती. ही बातमी खरी असेल तर दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये”.
“एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवण्यात महत्वाची भूमिका घेतली. पण यावेळी ते एकटे नव्हते तर लाखो शिवसैनिक होते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने आपण एकटेच शिवसेना वाढवतो असं समजू नये. शिवसैनिकांमुळे ही संघटना वाढली आहे,” असं केदार दिघेंनी सांगितलं. नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल असेल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा