संकटकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मदत मागणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेसचा हात धरत राजकारणात पाऊल ठेवलं आहे.
‘भाबीजी घर पर है’ या मालिकेत 'अंगुरी भाभी' साकारणारी मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाली. मात्र नंतर निर्मात्यांसोबत वाद झाल्याने शिल्पाला मालिका सोडावी लागली. त्यावेळी तिने मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली होती. मात्र निवडणूकीचे वारे वाहू लागताच शिल्पाने काँग्रेसचा हात धरल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिल्पाने पक्षप्रवेश केला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता कलाकारांना राजकारणाच्या रिंगणात उतरवण्याचा खेळ सुरू झाला आहे. यात शिल्पाचा उपयोग केवळ मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात येणार आहे की, तिला थेट निवडणूकीची तिकिट देण्यात येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण सध्या तरी पक्षाकडून तिच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही.
छोट्या पडद्यावर १९९९ पासून अभिनयाची कारकिर्द सुरू करणाऱ्या शिल्पाच्या करियरला २०१५ मध्ये कलाटणी मिळाली. 'भाबीजी घर पर है' या मालिकेतील शिल्पाच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांच्या मनात घर केलं. त्यानंतर २०१७ मध्ये ती 'बिग बाँस ११'मध्ये सहभागी झाली. चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे ती 'बिग बाँसच्या ११' ची विजेती ठरली.
'भाबीजी घर पर है' आणि 'बिग बॅास ११'नंतर शिल्पाच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शिल्पाच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेत काँग्रेसने तिला आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळे शिल्पाच्या काँग्रेस प्रवेशाचा पक्षाला किती फायदा होतो? ते पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा -
चिकू वाईन, चिकू सफारी आणि बरंच काही...
प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा? राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी